जामखेड : येथील ग्रामीण रुग्णालयाला कोविडसाठी आलेल्या दहा लाख रुपयांच्या निधीपैकी केवळ चार लाख रुपयेच खर्च झाले आहेत. सहा लाख रुपये खर्च न करता वरिष्ठ कार्यालयाला ग्रामीण रुग्णालयाने परत पाठविले आहेत. माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीत हा प्रकार उघड झाला.
येथील ग्रामीण रुग्णालयाला कोविड काळात दहा लाख रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्त झाला होता. परंतु, रुग्णालयाने कोविड सेंटर उभारले नव्हते. आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेऊन डॉ. आरोळे हॉस्पिटल व लगत जम्बो हॉस्पिटल शासनाच्या मदतीने उभारले होते. या जम्बो हॉस्पिटलला वीज गेल्यावर जनरेटर मार्फत वीजपुरवठा करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाने तीन लाख रुपये जनरेटर घेण्यासाठी व एक लाख दहा हजार रुपये औषधासाठी खर्च केले. इतर सर्व खर्च आमदार रोहित पवार यांनी केला. तसेच डॉ. आरोळे कोविड सेंटरला मोठ्या प्रमाणावर मदत केली. तीन ते चार हजार रुग्णावर मोफत उपचार केले.
शासनाकडून कोविडसाठी दहा लाखाचा निधी येऊनही ग्रामीण रुग्णालयाने तो खर्च केला नाही. केवळ चार लाख खर्च करून सहा लाख रुपये परत गेले. यामुळे कोविड काळात ग्रामीण रुग्णालयाची उदासीनता दिसून आली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत चार ते पाच हजार रुग्ण आढळून आले. शहरात खासगी नऊ रुग्णालयांना अनेक सोयी-सुविधांचा अभाव असताना आपत्कालीन म्हणून मंजुरी दिली. त्यांनी रुग्णांची सेवा करण्याऐवजी मोठ्या प्रमाणावर रुग्णांची आर्थिक लूट केली. याबाबत अनेक तक्रारी झाल्या असताना प्रशासनाने डोळेझाक केली. यानंतर आमदार पवारांकडे तक्रारी गेल्यानंतर त्यांनी प्रशासनाला कारवाई करण्यास सांगितले आहे.
मात्र अद्यापही कोणतीच पावलेले उचलली नाहीत.