लोणारे हत्या प्रकरणातील आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 19:10 IST
गेल्या आठवड्यात शिर्डीत हत्या झालेल्या लोणारे या तरुणाच्या मारेक-याला पकडण्यात सोमवारी शिर्डी पोलिसांना यश आले आहे़
लोणारे हत्या प्रकरणातील आरोपी जेरबंद
लोकमत न्यूज नेटवर्क शिर्डी : गेल्या आठवड्यात शिर्डीत हत्या झालेल्या लोणारे या तरुणाच्या मारेक-याला पकडण्यात सोमवारी शिर्डी पोलिसांना यश आले आहे़ या घटनेतील आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली़कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील नानासाहेब लोणारे या २५ वर्षीय तरूणाचा २२ आॅगस्ट रोजी तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून खून झाला होता़ शिर्डीनजीक निघोज शिवारातील देशमुख चारीजवळ ही घटना घडली होती. लोणारे याच्या गळ्यावर व पोटावर धारदार शस्राने वार करण्यात आलेले होते़ मारेकरी मृतदेह पाण्यात टाकून फरार झाले होते. या घटनेच्या तपासासाठी शिर्डी पोलिसांनी सापळा रचून सवंत्सर (कोपरगाव) येथे गणेश अशोक शिंदे या आरोपीस अटक केली. गुन्हा दाखल झाल्यावर शिर्डी पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक गतीमान करून आरोपीच्या मागावर पोलिसांना पाठवले. मयत लोणारे याचे फोन कॉल रेकॉर्ड तपासण्यात आली. मयतच्या मित्रांची चौकशी केली असता मयत सोबत त्याचा मित्र गणेश शिंदे असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या घरी जावून चौकशी केली असता घटनेच्या दिवसापासून तो फरार झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला. दरम्यानच्या काळात आरोपीच्या वडिलांचे निधन झाले़ वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी आरोपी येणार असल्याची पोलिसांना माहिती मिळाल्यावर पोलिसांनी अंत्यसंस्काराच्या ठिकाणी सापळा रचला. या सापळ्यात आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यावर गुन्ह्याची चौकशी केली असता आरोपी व मयत यांच्यात रॉबरी करण्याच्या कारणावरून वाद झाले. या वादातून आपण लोणारे यांचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली असे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी सांगितले़ आरोपीस राहाता न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार प्रताप इंगळे पुढील तपास करीत आहेत़