पारनेर नगरपंचायत निवडणूक महिनाभरावर येऊन ठेपली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस, पारनेर शहर विकास आघाडी स्वतंत्रपणे चाचपणी करीत आहेत. शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी, रामदास भोसले, काशिनाथ दाते, गणेश शेळके, विकास रोहोकले, अनिकेत औटी, निलेश खोडदे कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत. तर राष्ट्रवादीकडून आमदार निलेश लंके, डॉ. बाळासाहेब कावरे, निलेश लंके प्रतिष्ठानचे युवा अध्यक्ष विजय औटी यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते नियोजन बैठकीत सहभागी होत आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने स्थानिक पातळीवर शिवसेनेबरोबर जुळवून घ्या, असा संदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी आमदार व कार्यकर्त्यांना दिला आहे. यामुळे आमदार लंके यांनी शिवसेनेकडे युतीचा प्रस्ताव दिला आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्याबरोबर आमदार लंके यांची बैठक झाली आहे. या बैठकीत प्राथमिक स्तरावर जागांबाबत चर्चा झाली असल्याची माहिती आहे.
....
बैठकीकडे लक्ष
पारनेर नगरपंचायतीच्या निवडणूक संदर्भात आमदार निलेश लंके शिवसेनेचे वरिष्ठ नेत्यांबरोबर भेटी घेणार आहेत. मात्र, ग्रामपंचायत निवडणूक माघारी मुदत सोमवारी दुपारपर्यंत असल्याने त्या बिनविरोध करण्याच्या बैठकीत लंके व्यस्त आहेत. त्यामुळे सोमवारनंतरच नगरपंचायतीबाबत बैठक घेऊ, असा संदेश लंके यांनी सेना नेत्यांना दिल्याची माहिती आहे.
....