अहमदनगर: पाथर्डी तालुक्यातील जवखेडे येथील जाधव कुटुंबीयांची अत्यंत अमानुषरित्या हत्या करण्यात आली आहे़ दलीत कुटुंबीयांच्या हत्येची नगर जिल्ह्यातील ही तिसरी घटना आहे़ दलितांची हत्या करणाऱ्या नराधमांना पोलीस पकडणार आहे की नाही, असा सवाल उपस्थित करत खा़ रामदास आठवले यांनी दोन दिवसांत तपास लावा, अन्यथा जिल्हा बंद करू, असा इशारा सोमवारी मोर्चाव्दारे दिला़जवखेडे खालसा येथील जाधव कुटुंबीयांच्या हत्याप्रकरणाच्या निषेधार्थ विविध दलित संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ मोर्चाचे नेतृत्व खा़ आठवले यांनी केले़ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा आल्यानंतर त्याचे सभेत रुपांतर झाले़ त्यावेळी आठवले बोलत होते़ संघटनेचे श्रीकांत भालेराव, हनुमान साठे, अमर कजबे, गौतम सोनावणे, अशोक गायकवाड, भिमशक्तीचे नाथा अल्हाट, बहुजन सम्राटसेनेचे संजय कांबळे, मृतांचे नातेवाईक यावेळी उपस्थित होते़ आठवले यांनी पोलीस प्रशासनावर सडकून टीका केली़ ते म्हणाले, जवखेडे येथील दलीत कुटुंबीयांची हत्या करण्यात आली़ सात दिवस उलटून देखील या घटनेचा तपास लागत नाही़ अत्यंत हलाखीचे जीवन जाधव कुटुंबीय जगत होते़ बाजरीची काढणी करण्यासाठी गेलेल्या दलित कुटुंबीयांची हत्या करण्यात आली़ मानवतेला काळीमा फासणारी ही घटना असून, या घटनेचा येत्या दोन दिवसांत तपास लावा, अन्यथा जिल्हा बंद करण्यात येईल, असा इशारा यावेळी आठवले यांनी दिला़दलित संघटना कोणत्याही समाजाच्या विरोधात नाहीत, असा खुलासा करत खा़ आठवले यांनी हत्येचे कारण कोणतेही असो पोलिसांनी त्याचा तपास करून तातडीने मारेकऱ्यांना अटक करावी़ ते कोणत्याही समाजाचे असो, त्याच्याशी आम्हाला देणे घेणे नाही़ परंतु पोलीस तपासात हलगर्जीपणा करत असल्याने दलित संघटना पोलीस प्रशासनाचा निषेध करत असून, दोन दिवसांत पोलिसांनी घटनेचा तपास लावावा, अन्यथा गुरुवापासून दलित संघटनांच्यातीने जिल्हा बंद करण्यात येईल, असे सांगून आठवले यांनी बंद म्हणजे बंदच, असा इशारा दिला़ बंदसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे़ बंदमध्ये सहभागी होऊन जाधव कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन आठवले यांनी केले़ (प्रतिनिधी)
तपास लावा, अन्यथा जिल्हा बंद
By admin | Updated: October 28, 2014 01:01 IST