पारनेर तालुक्यातील वासुंदे येथे सोमवारी रात्री ही घटना घडली. पुतण्याच्या डोक्यात दगड घालून पलायन करणाऱ्या चुलत्यास ढवळपुरीत पोलिसांनी अटक केली आहे. राहुरी तालुक्यातील निंभेरे येथील सांगळे कुटुंबातील सदस्य पारनेर तालुक्यातील वासुंदे परिसरात बांधकामावरील सेंट्रिंगचे काम करतात. सोमवारी रात्री ८ ते ९ च्या दरम्यान शांताराम निवृत्ती सांगळे हा पुतण्या सोन्याबापू भीमराज सांगळे यास गावाकडे घेऊन निघाला. काही अंतरावर गेल्यानंतर चुलता शांताराम याने सोन्याबापू याच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन चुलता शांताराम याने सोन्याबापू याच्या डोक्यात दगड घातला. त्यात तो गंभीर जखमी झाला.
सोन्याबापू याचा भाऊ रामनाथ भीमराज सांगळे याने दिलेल्या फिर्यादीवरून चुलता शांताराम निवृत्ती सांगळे याच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. चुलता शांताराम यास पोलिसांनी तात्काळ अटक केली. पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी घटनास्थळी भेट दिली असून स्वतः बळप हे या तपास करीत आहेत.