पाचेगाव : नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे झालेल्या विविध विकास योजनेतील चार कामांतील गुणवत्ता, दर्जा आणि भ्रष्टाचार याबाबत करण्यात आलेल्या तक्रारींवरून राज्य गुणवत्ता निरीक्षक व्ही. गायकवाड यांनी गुरुवारी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांच्यासोबत नेवासा पंचायत समितीचे उपअभियंता संजय घुले, उपअभियंता गणेश सवाई उपस्थित होते.
पाचेगाव येथील ग्रामपंचायत अंतर्गत गावठाण दलितवस्तीमधील सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता, गावठाण दलितवस्ती बंदिस्त गटार, जिल्हा परिषद अंतर्गत सेस फंडातील पाचेगाव-पुनतगाव रस्त्यावरील खड्डे बुजविणे तसेच चौदा वित्त आयोगातील पाचेगाव-खिर्डी बंदिस्त गटार अशा चार योजनांतील कामे निकृष्ट आणि गुणवत्ताहीन असल्याचा तसेच या कामांत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तक्रारदार डॅनियल देठे यांनी केला होता.
चौकशी व्हावी यासाठी देठे यांनी पंचायत समिती नेवासा तसेच जिल्हा परिषद अहमदनगर येथे उपोषणही केले होते. या अगोदर नेवासा पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या चार योजनांच्या कामांची पाहणी करून अहवाल सादर केला होता; परंतु तक्रारदार देठे यांना पंचायत समितीचा अहवाल मान्य नसल्याच्या कारणाने गुरुवारी राज्य गुणवत्ता निरीक्षक अधिकारी गायकवाड यांच्या माध्यमातून या चारही कामांची पाहणी करण्यात आली. त्यानुसार राज्य गुणवत्ता निरीक्षक यांच्याकडून पंधरा दिवसांत अहवाल सादर करण्यात येईल, अशी ग्वाही देण्यात आली आहे. यावेळी उपसरपंच श्रीकांत पवार, गणेश तुवर, रवींद्र देठे, ठेकेदार, ग्रामपंचायत कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.