अहमदनगर : शासकीय योजनेच्या विकास कामांची तपासणी करण्यासाठी त्रयस्थ संस्था म्हणून येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयास परवानगी देण्यात आली आहे. तसा आदेश नगरविकास विभागाने जारी केला आहे.
शासकीय योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या विकास कामांची त्रयस्थ संस्थेकडून तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापूर्वी नाशिक, औरंगाबाद आणि पुणे शहरातील महाविद्यालयांनाच फक्त कामे तपासणीचे अधिकार होते. त्यामुळे औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांना पत्र देऊन तपासणी करून घेतली जात आहे. शासकीय महाविद्यालयांत पुरेसे मनुष्यबळ नसल्याने तपासणीसाठी वेळ लागत होता. नगरविकास विभागाने नगरमधील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाला परवानगी दिली आहे. त्यामुळे अधिकारी व ठेकेदारांच्या वेळेची बचत होणार असून, कामांची तपासणी करणे सुलभ झाले आहे.
विकास कामांची त्रयस्थ संस्थेने तपासणी करून अहवाल महापालिकेत सादर करावा लागतो. अंदाजपत्रकाप्रमाणे काम झाली आहेत किंवा नाही, याची तपासणी अभियांत्रिकीच्या प्राध्यापकांकडून तपासणी होते. ही तपासणी केल्यानंतरच ठेकेदाराची बिले महापालिकेकडून अदा केली जातात. त्रयस्थ संस्था म्हणून येथील महाविद्यालयास परवानगी मिळाल्याने वेळेत तपासणी होईल, असे ठेकेदारांचे म्हणणे आहे.
....