अहमदनगर : गणेशोत्सवाच्या आधी पावसाने हजेरी लावल्याने वातावरण प्रफुल्लीत झाले असले तरी उत्सवावर महागाईचे सावट आहे़ गणरायाच्या स्वागतासाठी दहा दिवस लागणाऱ्या विविध वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे़ मात्र, प्रत्येक वस्तुंचे दर दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्याने भाविकांच्या खिशाला चांगलाच चटका बसत आहे़ सार्वजनिक मंडळापासून ते घराघरात साजरा होणारा गणेशोत्सव अवघा सहा दिवसांवर येऊन ठेपला आहे़ सार्वजनिक गणेश मंडळांच्यावतीने पत्र्याचे शेड उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे़ शेड उभारणीसाठी मात्र, या वर्षी जास्त मजुरी द्यावी लागत आहे़ तर आरस, साऊंड सिस्टिम व इतर डेकोरेशनचाही मोठा खर्च वाढल्याने सार्वजनिक मंडळाचे बजेटही यावर्षी चांगलेच वाढले आहे़ आरस बनविण्यासाठी लागणाऱ्या थर्मकॉल, प्लॅस्टिक आॅफपॅरिस, रंग, रंगीत कागद, कापड यांच्या दरात वाढ झाल्याने यंदाचे आरस चांगलेच महागडे असणार आहेत़ तर गणेशमूर्तीसाठी जरीचे टोप, मोत्यांच्या माळा, शाल, डिझाईन केलेले उपरणेही महागले आहेत़ घरगुती गणेशोत्सवासाठीही वस्तू खरेदीसाठी भाविकांची बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे़ या काळात बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते़ इलेक्ट्रॉनिक दुकानामध्ये तर विविध प्रकारच्या आकर्षक लाईट विक्रीसाठी उपलब्ध आहेत़ (प्रतिनिधी)
बाप्पांच्या उत्सवावर महागाईचे सावट
By admin | Updated: August 24, 2014 02:06 IST