आॅनलाईन लोकमतनवनाथ खराडे / अहमदनगर, दि़ ४ - क्रीडा क्षेत्राप्रमाणेच आता कला क्षेत्रातीलही विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत वाढीव गुण मिळणार आहेत. राज्य सरकारने शास्त्रीय कला क्षेत्रात व लोककला प्रकारात सहभागी विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्याच्या सूचना शिक्षण मंडळाने दिल्या आहेत. मंडळाने तातडीने अंमलबजावणीस सुरुवात केल्याने नुकत्याच पार पडलेल्या दहावीच्या परीक्षेतील कलाकार विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत वाढीव गुण समाविष्ट केले जाणार आहेत.काही वर्षांपासून खेळाडूंना दहावीमध्ये वाढीव गुण देण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांनाही वाढीव गुण यंदापासूनच दिले जाणार आहेत. यासाठी राज्य सरकारने शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला प्रकारातील विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्यासाठी नवीन कार्यपद्धती अंमलात आणली आहे. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून ही कार्यपद्धती अंमलात आणण्याचे सुरुवातीला राज्य सरकारने जाहीर केले होते. मात्र, निर्णय बदलत तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सरकारने राज्यभरातील निवडक संस्थांना कलाकार विद्यार्थ्यांला प्रमाणपत्र देण्यास मान्यता दिली आहे. शास्त्रीय गायन, वादन व नृत्य प्रकारांतील १९ संस्था व लोककला प्रकारातील २९ संस्थांकडून प्रमाणपत्र घेता येणार आहे. शासनाने निवड केलेल्या संस्थेच्या प्रमाणपत्रासह शाळेच्या मुख्याध्यापकांकडे २० एप्रिल २०१७ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज जमा करावयाचे आहेत. शाळांकडे अर्ज प्राप्त झाल्यानंतर मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचा प्रस्ताव विभागीय मंडळाकडे पाठवायचा आहे. मुख्याध्यापकांवर २५ पैकी गुण देण्याची जबाबदारी आहे. शाळांना विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याची ३० एप्रिल २०१७ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.ही सवलत नियमित विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. पुनपरीक्षार्थी, श्रेणीसुधार किंवा मोजके विषय निवडून परीक्षा देण्याऱ्या विद्यार्थ्यांना वाढीव गुण मिळणार नाहीत. विद्यार्थी नापास होत असल्यास पास होण्यास जितके गुण कमी पडतात, तितके गुण एक किंवा सर्व विषयांत विभागून देण्यात येतील. गुण शिल्लक राहिल्यास टक्केवारीमध्ये जमा करण्यात येणार आहेत. देण्यात येणारे गुण स्वतंत्रपणे गुणपत्रिकेमध्ये दाखविण्यात येणार आहेत.शास्त्रीय कलेमध्ये गायन, वादन व नृत्य, तसेच लोककला प्रकारात लावणी, शाहिरी,भारुड, गोंधळ, नारदीय कीर्तन व इतर लोककलेत प्राविण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांना गुण मिळतील. जून -२०१७ मधील निकालामध्ये कलाकार विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेमध्ये वाढीव गुण दिसणार आहेत.गुणांची मर्यादा २५ मंडळाने कलाकार विद्यार्थ्यांसाठी गुणांची कमाल मर्यादा २५ ठेवली आहे. मुख्याध्यापकांनी कलाकार विद्यार्थ्यांच्या गुणांचा गोपनीय अहवाल विभागीय मंडळाकडे जमा करावयाचा आहे. एखादा विद्यार्थी एकापेक्षा जास्त संस्थांमध्ये कला व क्रीडाविषयक शिक्षण घेत असल्यास, एकापेक्षा जास्त कला अथवा क्रीडा प्रकारात प्राविण्य प्राप्त करत असला, तरी त्याला गुणांची कमाल मर्यादा २५ ठरविण्यात आली आहे.जिल्ह्यातील संस्था जिल्ह्यात लोककला प्रकारातील ४ संस्थांना अधिकार देण्यात आले आहेत. त्यामध्ये शाहिरी शिकविणारे पाथर्डी येथील महाराष्ट्र कलापथक संच या संस्थेचा समावेश आहे. संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील कला सम्राज्ञी पवळा कलामंच व कोपरगावमधील लोककला व कलावंत उत्कर्ष मंडळ या दोन संस्था लावणी या लोककलेचे शिक्षण देतात. तसेच कर्जत तालुक्यातील थेरगाव येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्रतिष्ठानमध्ये लोककलेचे शिक्षण दिले जाते.
दहावीच्या कलाकारांना मिळणार वाढीव गुण
By admin | Updated: April 5, 2017 13:03 IST