पाचेगाव : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे प्रवरेच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ झाली. त्यामुळे प्रवरा नदी खळखळून वाहू लागली आहे.
दमदार पडत असलेल्या पावसामुळे मुळा आणि प्रवरा नदीमध्ये लाभक्षेत्र परिसरातील ओढे-नाले येऊन मिळत असल्याने नदीत पाण्याच्या प्रवाहात वाढ झाली आहे. प्रवरेच्या पात्रात पाणी वाढल्याने यंदाच्या पावसाळी हंगामात प्रवरामाई दुसऱ्यांदा वाहती झाल्याचे पाहावयास मिळाले आहे.
बुधवारी संध्याकाळी जलसंपदा विभागाकडील आकडेवारीनुसार मधमेश्वर बंधाऱ्यातून प्रवरेतून जायकवाडीच्या दिशेने ३९७० क्युसेकने पाण्याचा प्रवाह सुरू होता.
गेल्या चोवीस तासात प्रवरेतून १५४ दलघफू पाणी जायकवाडीच्या दिशेने झेपावले होते.
जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत जायकवाडीच्या दिशेने प्रवरेतून दोन टीएमसीपेक्षा अधिक पाणी झेपावले आहे.