राहुरी : पिकांना पाण्याची अधिकाधिक आवश्यकता असते. पिकांना सूक्ष्म सिंचनाचा वापर करुन कमी पाण्यात अधिक उत्पादन घेऊन पाण्याची बचत करता येते. विद्यापीठाने विकसित केलेल्या काटेकोर पाणी व्यवस्थापनाकरिता विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करुन पिकांच्या सिंचनाची कार्यक्षमता वाढणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठातील हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापनाचे आधुनिक कृषी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राद्वारे जागतिक जल दिनानिमित्त आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील बोलत होेते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून कृषिभूषण पांडुरंग आव्हाड उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून नेटाफिम इंडिया प्रा.लि.चे अरुण देशमुख यांनी मार्गदर्शन केल. याप्रसंगी डॉ. अशोक फरांदे, डॉ. दिलीप पवार, डॉ. सुनील गोरंटीवार, डॉ. एम. एस. माने उपस्थित होते. सकाळच्या सत्रात कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांच्या हस्ते आंतरविद्या जलसिंचन व्यवस्थापन विभागाच्या प्रक्षेत्रावर सिंचन प्रकल्पाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, विभाग प्रमुख डॉ. एम. एस. माने उपस्थित होते.