कोतूळ परिसरात कोरोना रुग्ण वाढत असताना ग्रामीण रुग्णालयात व प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा देण्याचा तसेच जागेचा ताण वाढल्याने कोतूळ ग्रामपंचायत सदस्य तथा राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष हेमंत देशमुख, उपसरपंच संजय देशमुख, योगेश देशमुख, संतोष नेवासकर व मित्रमंडळींनी काही रक्कम जमा करून कोतुळेश्वर विद्यालयात सहा खोल्यांचे कोविड उपचार केंद्र सुरू केले. कोतूळ पंचक्रोशीतील बाधितांना औषधोपचार, जेवण, पाणी आदी सुविधा पुरवण्यात येणार आहेत.
तरुणांनी आमदार डाॅ. किरण लहामटे, तहसीलदार मुकेश कांबळे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. कृष्णा वानखेडे, तालुका आरोग्य अधिकारी इंद्रजित गंभिरे, सरपंच भास्कर लोहकरे, महसूलचे संतोष जाधव, शिक्षण विभागाचे राजेश पावसे यांनी या उपचार केंद्राचे उद्घाटन केले. यावेळी आनंद देशमुख, सचिन नरवडे, अभिजित देशमुख आदी उपस्थित होते.
.........
आठ दिवसांत दोन रुग्णवाहिका
आरोग्य सुविधेसाठी तालुक्यात नव्या दोन रुग्णवाहिका आठ दिवसांत देणार आहे. त्यातील एक कोतूळ परिसरासाठी देण्यात येईल तसेच कोतूळ येथील ग्रामीण रुग्णालय व आरोग्य केंद्रात तातडीने वैद्यकीय अधिकारी देण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या असल्याचे आमदार लहामटे यांनी सांगितले.