नेवासा (जि. अहमदनगर) : मागील सरकारच्या काळात मला मोठा त्रास झाला. मला मोठ्या अडचणी आल्या. या काळात मला धनंजय मुंडे यांनी त्यातून वाचविले, असा गौप्यस्फोट पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केला.
वंजारवाडी (ता. नेवासा) येथे संत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते डॉ. लहाने यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. शनिवारी (दि. ३०) रात्री हा कार्यक्रम झाला. लहाने म्हणाले, धनंजय मुंडे यांना मी लहानपणापासून ओळखतो. गेल्या सरकारच्या सत्ताकाळात मला अनेक अडचणी आल्या. मी मोठा त्रास सहन केला. केवळ नातेवाईक किंवा शासनाचा कर्मचारी म्हणून नव्हे, तर दोघांनीही सेवाव्रत स्वीकारलेले आहे. याच नात्याने धनंजय मुंडे यांनी मला त्या संकटातून सोडविण्यासाठी मोलाची मदत केली. मी धनंजय मुंडे यांचे जाहीर आभार मानीन, असे लहाने म्हणाले. कार्यक्रमास विष्णू केंद्रे महाराज, माजी खासदार तुकाराम गडाख, उदयनराजे गडाख, भगवान महासंघाचे उपाध्यक्ष सुभाष जावळे, आदी उपस्थित होते.
.....................
त्या गावांची नावे बदलून घ्या
पुरोगामी महाराष्ट्रात जातीच्या नावाने असलेल्या गावाचे नाव ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन बदलण्याचा ठराव करावा. आपल्या गावाला राष्ट्रपुरुष अथवा संताचे त्या गावांच्या महतीनुसार योग्य नावे द्यावे, असे आवाहन कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी केले.
..............
माझे पुण्य मुंडेंना मिळो
मुंडे हे कायम गोरगरिबांच्या सेवेस प्राधान्य देतात. मी सरकारी नोकर आहे. तरीही ते नेहमी माझ्या पाया पडून आशीर्वाद घेतात. माझ्या आयुष्यात कमावलेले सर्व पुण्य धनंजय यांना मिळो, अशा शब्दांत डॉ. लहाने यांनी धनंजय मुंडे यांना आशीर्वाद दिले.
..............
शनी शिंगणापूर येथे दर्शन
धनंजय मुंडे यांनी श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथे शनी देवाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत डॉ. तात्याराव लहाने, उदयनराजे गडाख, आदी उपस्थित होते.
.............