शेवगाव/खरडगाव : तालुक्यातील खरडगावातील आरोग्य केंद्राशेजारील वस्तीवर दारूच्या नशेत पत्नीचा खून करून, पतीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.२०) सकाळी उघडकीस आली.
लताबाई दशरथ दळे (वय ४५), दशरथ मन्साराम दळे (वय ५०, दोघेही रा.खरडगाव, ता.शेवगाव) अशी मृतांची नावे आहेत. दशरथ दळे याने गुरुवारी (दि.१९) रात्री पत्नी लताबाई दळे हिच्या डोक्यात लाकूड घालून खून केला. त्यानंतर, त्याने घरापासून काही अंतरावर असलेल्या एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री बाहेर गेलेला मुलगा शुक्रवारी (दि.२०) सकाळी घरी आल्यानंतर त्याला आईचा मृतदेह घरात आढळला. त्याने वडिलांचा शोध घेतला, तर त्यांचा मृतदेह घरापासून जवळच असलेल्या एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. हा प्रकार पाहून घाबरलेल्या मुलाने शेवगाव पोलिसांना तत्काळ संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलीसही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शेवगाव ग्रामीण रुग्णालय येथे पाठविले. दरम्यान, दारूच्या नशेत पतीने पत्नीचा खून करून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने असे कृत्य का केले, याचे कारण समजू शकले नाही. या घटनेनंतर गावातील अवैध दारू विक्री व्यवसायाबाबत ग्रामस्थांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी संताप व्यक्त केला आहे. या घटनेनंतर गावातील अवैध दारू विक्री व्यवसायाबाबत ग्रामस्थांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, याच गावात राहणाऱ्या बाळासाहेब तुकाराम लोणकर व त्यांची मुलगी अश्विनी बाळासाहेब लोणकर या बाप-लेकीने २७ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या मुलीने घरात तर वडिलांनी शेतात जाऊन आत्महत्या केली होती.