अहमदनगर : जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, यापूर्वी पॉझिटिव्ह होते ते बरेही झाले. पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवली असता त्यांनी तपासणी केली. त्यामध्ये ते दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आढळून आले, अशा व्यक्तींची संख्या नेमकी किती ? याबाबत आरोग्य यंत्रणेकडे मात्र कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती.
अहमदनगर जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सध्या रोज सरासरी १५० जण पॉझिटिव्ह येत आहेत. गतवर्षी मार्चपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. एप्रिलनंतर तो अधिकच पसरला. एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत बाधितांची संख्या वाढली होती. बाधित झालेल्यांपैकी ९७ टक्के बरे झाले आहेत. मात्र, त्यापैकी अनेकजण दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह येत आहेत. त्यांच्यावर उपचारही सुरू आहेत. नगर शहर व ग्रामीण भागात असे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, याबाबत आरोग्य यंत्रणेकडे सध्यातरी कोणतीही नोंदणी नसल्याचे दिसून आले आहे.
-------------
मास्क, सामाजिक अंतर हाच उपाय
एकदा कोरोना झाल्यानंतर पुन्हा कोरोना होणार नाही हा एक गैरसमज आहे. कोरोनाच्या शरीरात ऑन्टीबॉडी तयार झाल्या की, आता काळजी करण्याचे कारण नाही, असा अनेकांचा समज आहे. मात्र तो काही रुग्णांच्या बाबत खोटा ठरत आहे. त्यामुळे यापूर्वी बाधित झालेल्यांनीही कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळणे गरजेचे आहे. तोंडाला मास्क आवश्यक असून सॅनिटायझर, सामाजिक अंतर पाळणे आवश्यक आहे. सर्वांनीच या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य यंत्रणेने केले आहे.
----------------
एकदा कोरोना झाला की, तो पुन्हा होतो किंवा होत नाही, याबाबत काहीही सांगता येत नाही. बाधिताच्या शरीरात कोरोनाच्या ऑन्टीबॉडी तयार झाल्या की, त्या किती दिवस टिकतात, हे प्रत्येकाच्या प्रकृतीवरच अवलंबून आहे. सध्यातरी याबाबतचे संशोधन किंवा मार्गदर्शन प्राप्त नाही. तसेच वैद्यकीय क्षेत्रातही याबाबत मतमतांतरे आहेत.
-डॉ. अनिल बोरगे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका.
--
डमी