लोकमत न्यूज नेटवर्क
शेवगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दहावी, बारावीच्या परीक्षासह एमपीएससी, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. दरम्यान, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असून बारावीच्या परीक्षा तूर्तास स्थगित ठेवल्या आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांनी वर्षभर शाळेत न जाता ऑनलाईन शिक्षण घेऊन आज ना उद्या परीक्षा होतील, या अपेक्षेने अभ्यास सुरु ठेवला आहे. मात्र आम्हाला आणखी किती दिवस अभ्यास करावा लागणार? असा सवाल विद्यार्थी करीत आहेत.
मागील वर्षी कोरोना आजाराचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन २३ मार्च रोजी शाळा बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असताना २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरु करत इयत्ता ९ ते १२ पर्यंत वर्ग भरण्यास सुरुवात झाली होती. दरम्यान कोरोना आजाराने डोकेवर काढताच पुन्हा शाळा अवघ्या काही महिन्यात बंद करण्यात आल्या. दरम्यान शिक्षण विभागाकडून शिक्षक व विद्यार्थी यांच्या लेखी सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्या सर्व सूचनांचा विचार करुन २९ एप्रिल ते २० मे दरम्यान इयत्ता दहावी परीक्षाचे वेळापत्रक शिक्षण मंडळाने जाहीर केले होते. कोरोना दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढू लागल्याने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. दहावीच्या परीक्षा आता जून महिन्यात होणार असल्याचे सांगितले.
परिणामी, विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. शैक्षणिक वर्षात कधीकधी ऑनलाईन तर जेमतेम दोन महिने शाळेत धडे मिळाले. मात्र ते शिक्षण किती विद्यार्थ्यांच्या लक्षात राहिले हा संशोधनाचा विषय आहे. बहुतांश विद्यार्थ्यांनी पुढील शैक्षणिक दिशा ठरवून चांगले गुण संपादन करावयाचे हे स्वप्न पाहून अभ्यासावर भर दिला आहे. मात्र कोरोना परिस्थिती कधी निवळणार, कधी परीक्षा होणार या विवंचनेत आणखी किती काळ दहावीचा अभ्यास करत बसावा लागणार? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
----- -