श्रीरामपूर : दिवंगत नेते खासदार गोविंदराव आदिक यांच्या नावाने असलेले पालिकेचे सहा कोटी रुपये खर्चाचे नाट्यगृह पाच वर्षांपासून लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. पालिकेवर दीर्घ काळ वर्चस्व ठेवणाऱ्या जयंत ससाणे यांच्या प्रयत्नातून हे नाट्यगृह उभे राहिले. शहराच्या जडणघडणीत आदिक व ससाणे या दोन्ही दिग्गज नेत्यांचे खूप मोठे योगदान राहिले. मात्र, तरीही त्यांच्याशी संबंधित ही देखणी वास्तू नागरिकांसाठी खुली होऊ शकलेली नाही. आणखी किती काळ नाट्यगृहाची उपेक्षा करणार? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो आहे.
जिल्ह्यात कोणत्याही नगरपालिकेकडे नाही अशी दिमाखदार नाट्यगृहाची इमारत संगमनेर रस्त्यावर साकारली आहे. जयंत ससाणे यांच्या हस्ते ११ ऑक्टोबर २०१६ मध्ये नाट्यगृहाचे उद्घाटन करण्यात आले होते. नंतरच्या काळात पालिकेत सत्तांतर होऊन गोविंदराव आदिक यांच्या कन्या अनुराधा आदिक या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या. नाट्यगृहाच्या आवारात असलेले एक अतिक्रमण प्रारंभी आडवे आले. त्यामुळे पालिकेला अग्निशमन विभागाचा परवाना मिळण्यास आडकाठी आली. मात्र, अतिक्रमणही दूर करण्यात आले. तरीही कुठे माशी शिंकली हे समजायला तयार नाही. अद्यापही नाट्यगृहाला तो परवाना मिळालेला नाही. त्यामुळे नाट्यगृह कार्यक्रमांसाठी सज्ज असूनही पाच वर्षे बंदच आहे.
पालिकेतील विरोधी काँग्रेस नगरसेवकांनी काही महिन्यांपूर्वी नाट्यगृहाची पाहणी केली. त्याची छायाचित्रे काढली. तेथील खिडक्यांची मोडतोड झाल्याचे दिसून आले. आतील आसन व्यवस्था तसेच लाइट व साऊंड सिस्टम यंत्रणाही खराब होण्याची भीती आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये नाट्यगृहाचे उद्घाटन होऊन पाच वर्षे पूर्ण होतील. लवकरच पालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. कोविडचे प्रतिबंधात्मक नियमही लागू करण्यात आलेले आहे. त्यामुळे कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम नाट्यगृहात होणे आता शक्य नाही. नगराध्यक्षा आदिक यांच्याच वडिलांच्या नावे ती वास्तू आहे. त्यामुळे किमान त्याचे लोकार्पण तरी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
-------
नाट्यगृहाची वैशिष्ट्ये :-
सहा कोटी रुपये खर्च
तीन हजार चौरस फूट नाट्यगृह
संपूर्ण वातानुकूलित
७१० आसनक्षमता
नाटकाच्या पूर्वतयारीचा हॉल
वातानुकूलित व्हीआयपी कक्ष
स्वतंत्र वाचन कक्ष
अत्याधुनिक ध्वनी यंत्रणा
मेकअप कक्ष
प्रशस्त बगिचा
----------
अग्निशमन संचालनालयाने पालिकेला दिलेल्या तात्पुरता परवान्याची मुदत संपली आहे. आपण प्रस्ताव दिलेला आहे. अतिक्रमण दूर झाले आहे. त्यामुळे नाट्यगृहाला कायमस्वरूपी परवाना लवकरच मिळेल.
- गणेश शिंदे, मुख्याधिकारी, श्रीरामपूर पालिका.
--------