भंडारदरा उभारणीस ९५ वर्षे पूर्ण झाली. गेल्या ४० वर्षांत केवळ सहा वेळा १५ ऑगस्टपूर्वी धरण ओव्हरफ्लो झाल्याची नोंद आहे. २०१९ मध्ये २ ऑगस्टला तांत्रिकदृष्ट्या धरण भरले होते. यंदा धरण पाणलोटावर पाऊस रुसला आहे. जुलै महिन्यात मोठा पाऊस झाला नाही. गतवर्षी कोविडच्या सावटामुळे जलोत्सवाचा आनंद पर्यटकांना घेता आला नाही. यंदा मात्र पर्यटक कोविड सावट झुगारून कोरोना नियमांचे पालन करत भंडारदरा परिसरात जलोत्सवाचा आनंद घेतला जात आहे.
गतवर्षीच्या पाणीसाठ्याच्या आधारावर भंडारदरा धरणात ९ हजार ७०३ दशलक्ष घनफूट म्हणजे ८८ टक्के तर निळवंडे धरणात ५ हजार ४१० दशलक्ष घनफूट म्हणजे ६४ टक्के पाणीसाठा आजमितीस झाला आहे. १९८० पासून आतापर्यंत १९९०, २००५, २०११, २०१८, २०१९, २०२० असे सहा वेळा १५ ऑगस्टपूर्वी तर गेल्या ३९ वर्षांत १८ वेळा ऑगस्ट महिन्यातच भंडारदरा ओसंडल्याची नोंद आहे. केवळ सात वेळा म्हणजे १९८५, १९८६, १९८७, १९८९, १९९५, २००० व २०१५ ला धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही.