देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथे माजी आमदार राहुल जगताप यांच्या वतीने कोविड सेंटर लवकरच सुरू होत असून, त्यासाठी तरुणांनी मदतीचा हात देऊ केला आहे.
कोरोनाने ग्रामीण भागात हातपाय पसरायला सुरुवात केल्यामुळे माजी आमदार राहुल जगताप यांनी पिंपळगाव येथे १५० बेडचे व २५ ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. अनेक जण या कार्याला मदतीचा हात देताना विविध प्रकारची मदत करीत आहेत.
श्रीगोंदा तालुक्याचा पाश्चिम पट्टा जगताप यांना मानणारा आहे. कालिदास जगताप यांनी ११ हजार, किशोर घेगडे ११ हजार, सुहास शिंदे ११ हजार १११, बाबु राक्षे ९ हजार ९९९, शशिकांत गव्हाणे ५ हजार ५५५, सुधीर घेगडे ५ हजार ५५५, विलास घेगडे ५ हजार, अभिजित ढवळे ५ हजार आणि काका शिर्के ३ हजार ३३३ अशी रोख स्वरूपात मदत जाहीर केली आहे.
ही मदत नक्कीच तालुक्यातील कोरोना रुग्णांना उत्तम आहार, औषधोपचार व इतर सुविधांसाठी लाखमोलाची ठरणार असल्याचे जगताप यांचे सहकारी किशोर घेगडे यांनी सांगितले. तसेच इतरांना मदतीचे आवाहनही त्यांनी केले आहे.