शिर्डी : कमिशनसाठी रुग्णाला लावण्यात आलेली आॅक्सिजनची नळी उपसणाऱ्या त्या डॉक्टराला व्यवस्थापनाने अखेर काल घरचा रस्ता दाखवला़ या डॉक्टराला निलंबित करण्यात आले असून अशाच प्रकारच्या आरोपांच्या घेऱ्यात असलेल्या अन्य दोन डॉक्टरावरील कारवाईचा प्रस्ताव व्यवस्थापनाच्या आगामी बैठकीत ठेवण्यात येणार आहे़ साईबाबा रुग्णालयातील एका डॉक्टरने गेल्या आठवड्यात एका मुंबईच्या भाविकाला उपचारासाठी नाशिकला नेण्याचा आग्रह केला होता़ ठराविक रुग्णालयातच या पेशंटला न्यावे असा त्याचा हट्ट होता़ मात्र नातेवाईकांनी अन्य रुग्णालयात नेणार असल्याचे सांगितल्याने त्याने कार्डियाक अॅम्ब्युलन्स मधील रुग्णाला लावण्यात आलेली आॅक्सिजनची नळीच उपसून घेतल्याची तक्रार रुग्णाच्या नातेवाईकांनी साई संस्थान व रुग्णालय प्रशासनाकडे केलेली होती़ रुग्णांच्या जीवन मरणाशी संबंधित असलेला व सार्इंच्या रुग्णसेवेला काळीमा फासणाऱ्या या प्रकाराबाबत माध्यमांनीही आवाज उठवला होता़ शहरातील सचिन तांबे, सर्जेराव कोते, सचिन शिंदे, प्रमोद गोंदकर, दीपक वारूळे, नितीन कोते, राजेंद्र गोंदकर, भाऊ भोसले, किरण कोते, वैभव कोते आदींनी प्रशासनाला निवेदन देवून या डॉक्टरांवरील कारवाई करण्याची मागणी केली होती़ त्या अनुषंगाने काल व्यवस्थापनाच्या झालेल्या बैठकीत या डॉक्टरला निलंबित करून त्याची विभागीय चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला़ विशेष म्हणजे डॉक्टर व औषधांचा तुटवडा यामुळे होणारे गरीब रुग्णांचे हाल, पिळवणूक या प्रकाराकडे व्यवस्थापनाचे लक्ष वेधले गेले़ या संवेदनशील विषयावर येत्या २८ डिसेंबर रोजी स्वतंत्र बैठक घेण्याचा निर्णयच संस्थानचे अध्यक्ष व जिल्हा प्रधान न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी व जिल्हाधिकारी तसेच समितीचे सदस्य अनिल कवडे यांनी घेतला असल्याचे सांगण्यात आले़ यामुळे रुग्णालयाच्या अनेक दिवसांपासून व्यवस्थापनासमोर रखडलेल्या प्रस्तावांना चालना मिळण्याची व रुग्णालयाची घडी पुन्हा बसण्याची चिन्हे आहेत़ (तालुका प्रतिनिधी)
‘तो’ डॉक्टर अखेर निलंबित
By admin | Updated: December 16, 2015 23:08 IST