योगेश गुंड
केडगाव : इंग्रजी माध्यमाचे वाढते फॅड, सीबीएसई पॅटर्नचा बोलबाला, यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा टिकतील की नाही, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, डिजिटल युगाबरोबर जुळवून घेत जिल्हा परिषदेच्या शाळांनीही प्रभावी अध्यापन सुरू केले आहे. यामुळे अलीकडच्या काळात या शाळांनाही पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. नगर तालुक्यात ६२ मुलांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेला राम राम ठोकत जिल्हा परिषद शाळांची वाट धरली आहे.
इंग्रजी माध्यम, सीबीएसई, आयसीएसई, इतकेच नव्हे तर आयबीच्या शाळांमध्ये मुलांना प्रवेश मिळावा, यासाठी पालक आपला वेळ, प्रतिष्ठा, पैसा पणाला लावत आहेत. अगदी यांचे शैक्षणिक शुल्क न परवडणाऱ्या पालकांनीही आपली मुले इंग्रजी माध्यमात टाकण्यासाठी रांगा लावल्या होत्या. मात्र, बदलत्या काळाप्रमाणे जिल्हा परिषद शाळांचा दर्जाही बदलत गेला. अनेक तंत्रस्नेही शिक्षकांनी डिजिटल युगाशी हातमिळवणी करीत संगणकीय शिक्षणाचा आधार घेतला. उच्च शिक्षित तरूण शिक्षकी पेशाकडे वळल्याने जिल्हा परिषद शाळांचे रूपडे पालटत गेले. ग्रामीण भागातील अगदी पहिलीच्या मुलांचे हात संगणकाशी खेळू लागल्याने जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता सरस ठरत गेली. आता जिल्हा परिषद शाळांमध्ये इंग्रजी माध्यमातील मुले प्रवेश घेत आहेत. त्याची संख्या अलीकडे वाढत असून, फक्त नगर तालुक्यात आतापर्यंत ६२ मुलांनी इंग्रजी माध्यमाची हवा खाऊन पुन्हा जिल्हा परिषद शाळांची वाट धरली.
-----
जिल्हा परिषदेचे सर्व शिक्षक प्रशिक्षित आहेत. ते घरोघरी जाऊन मुलांना अध्यापन करतात. मातृभाषेतील शिक्षणच प्रभावी व योग्य आहे, याची जाणीव पालकांना झाली. इंग्रजी माध्यमातील मुलांपेक्षा मराठी शाळेतील मुलांचा आत्मविश्वास जास्त वाटतो. त्यातच मराठी माध्यमात पाठ्यपुस्तके, गणवेश, शैक्षणिक साहित्य, विविध शासकीय शिष्यवृत्ती याचा लाभ मिळतो. यामुळे पालकांमध्ये मतपरिवर्तन होत आहे.
-आबा लोंढे,
राष्ट्रपती पदक विजेते जि. प. शिक्षक
----
लॉकडाऊन कालावधीत पालकांना घरी मुलांचा अभ्यास घेण्यात अडचणी आल्या. जिल्हा परिषद शाळांची वाढलेली गुणवत्ता, कोरोनामुळे घराजवळील शाळाच योग्य, अशी मानसिकता. शाळेतील शिक्षक ऑनलाईन शिक्षणासह मोबाईल नसलेल्या पालकांच्या गृहभेटी घेऊन मार्गदर्शन करतात. मराठी माध्यमातील मुलांची अभ्यासातील प्रगती पाहून पालक जिल्हा परिषद शाळांकडे वळत आहेत.
-बबनराव बनकर,
मुख्याध्यापक, जि. प. शाळा, चास