बेलवंडी : श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे येथील तरुणांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या हरित परिवार ग्रुपच्या माध्यमातून ‘एक ओंजळ पक्ष्यांसाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
दुष्काळ, पावसाची अनिश्चितता, अवैध वृक्षतोड यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दीड वर्षापूर्वी जुलै महिन्यात २०१९ रोजी चिंभळे (ता. श्रीगोंदा) येथील युवकांनी एकत्र येऊन हरित परिवार ग्रुपच्या माध्यमातून चार एकर पडीक जमिनीत वड, चिंच, जांभूळ, सीताफळ, पेरू, आंबा, उंबर, लिंब अशा ४०० झाडांची लागवड केली. त्याला कूपनलिका व ठिबकद्वारे पाणीपुरवठा करून हिरवीगार वनराई फुलविली. तारेचे कंपाउंड केले. पक्ष्यांनी झाडांवर घरटे बांधले आहेत. हरित परिवार ग्रुपने एकत्र येऊन एक ओंजळ पक्ष्यांसाठी हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.
पत्र्याचे पाच डबे घेऊन कमी खर्चात योग्य पद्धतीने कट करून त्यामध्ये पाण्याची सोय करून दररोज बाजरी, तांदूळ, ज्वारी, गहू असे धान्य झाडावर लटकविले आहेत. धान्याचे दाणे खाण्यासाठी व पाणी पिण्यासाठी परिसरातील चिमण्या, कावळे, साळुंकी, कबुतर, तितर, कोतवाल, भारद्वाज, कोकीळ आदी पक्षी येत आहेत. पक्ष्यांच्या किलबिलाटाने संपूर्ण वनराईचा परिसर गजबजून गेला आहे.
---
दुष्काळामुळे पाण्याअभावी चिमण्यांचा जीव कासावीस होतो. प्रत्येकाने आपल्या घराच्या छतावर व झाडांवर पक्ष्यांसाठी थोडे पाणी व धान्य ठेवल्यास ते खरे पुण्य होईल.
-सचिन गायकवाड,
सामाजिक कार्यकर्ते, चिंभळा, ता. श्रीगोंदा