अवैधरीत्या गुटखा विकला जात असून, अन्न व औषध विभाग तसेेच पोलीस प्रशासनाचा धाक दिसत नाही. संगमनेरात बऱ्याच ठिकाणी गुटखा विक्री केली जाते. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गुटख्याचे आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करताना दिसतात. त्यामुळे तरुण पिढी बरबाद होत आहे. तसेच सार्वजनिक आरोग्य बिघडवणाऱ्या गुटखा, तंबाखूमुळे महिला वर्गात देखील संताप व्यक्त केला जातो आहे. गुटखा विक्रेत्यांवर कारवाई होत नाही, त्यामागे ज्या अधिकाऱ्यांचे लागेबांधे आहेत. अशांच्या विरोधात पुरावे गोळा करून अन्न व औषध प्रशासनमंत्री यांना देणार आहे. इंदिरानगर, जनतानगर, अभंग मळा, पद्मानगर, बस स्टँड परिसर, कुंभारआळा ह्या उपनगरासह कासारवाडी, घुलेवाडी आणि महत्त्वाचे गुटखा केंद्र असलेल्या निमगावजाळी, कोंची परिसरातील कुप्रसिद्ध गुटखाकिंग विक्रेत्यांची नावासह यादीच सदरील निवेदनासोबत जोडली आहे. निमगाव जाळी येथील गुटखाकिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीने तब्बल चाळीस ते पन्नास हस्तकांमार्फत शहर व तालुक्यातील प्रत्येक पान टपरी, किराणा दुकाने यांच्यापर्यंत अवैधरीत्या गुटखा विक्रीचे जाळे पसरवलेले असल्याचे पुरावे देखील आहेत. अशा गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा कोणत्याही क्षणी शिवसेना रस्त्यावर उतरून कायदा हातात घेईल व त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा संगमनेर शिवसेनेने दिला आहे.
संगमनेरात सर्रासपणे गुटखा विक्री, कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:16 IST