निंबळक : निंबळक-नागापूर रस्त्यावर सापडलेले सत्तर हजार रुपये येथील प्राथमिक शिक्षक दादा घोलप यांनी खारेकर्जुने (ता. नगर) येथील हॉटेल व्यावसायिक गंगाधर लांडे यांना प्रामाणिकपणे परत केले.
खारेकर्जुने येथील हॉटेल व्यावसायिक गंगाधर लांडे यांनी स्वत:चे वाहन सत्तर हजार रुपयांना विकले. ते पैसे बॅगेत ठेवून ते नागापूर-निंबळक मार्गे गावी निघाले होते. या दोन गावांच्या दरम्यानच त्यांची बॅग पैशांसह रस्त्यावर पडली. रस्ता खराब असल्यामुळे बॅग पडलेली लक्षात आली नाही. दरम्यान, याच वेळी रस्त्यावरून ब्राह्मणी येथे प्राथमिक शिक्षक असलेले दादा घोलप, बंडू भोर चालले होते. त्यांना ही बॅग सापडली. तोपर्यंत पैसे हरविल्याचे लांडे यांच्या लक्षात आले. त्यांनी परिसरात शोध सुरू केला. मात्र पैसे सापडले नाहीत. पैसे असलेली बॅग लांडे यांची असल्याचे घोलप यांना समजले. ते ही बॅग घेऊन लांडे यांच्याकडे गेले. तेथे लांडे यांनी नोटांचा तपशील बरोबर सांगितल्यानंतर घोलप यांनी ती रक्कम परत केली. लांडे यांनी घोलप यांना रोख बक्षीस देऊ केले, मात्र त्यांनी ते नाकारले.
---
१५ दादा घोलप