नेवासा : बालसंस्कार महाराष्ट्र समूहने सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या कार्यानुभव कार्यशाळेला चांगला प्रतिसाद लाभला. या कार्यशाळेत हजारो विद्यार्थी सहभागी झाले.
कोरोना कालावधीत ‘शाळा बंद, शिक्षण चालू’ याअंतर्गत विविध माध्यमांतून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा या उद्देशाने ‘बालसंस्कार महाराष्ट्र समूह’ राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवत असतो. याअंतर्गत नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद प्रवरासंगम येथे कार्यरत असलेल्या उपक्रमशील शिक्षिका शितल झरेकर यांच्या ‘कागदकाम’ कार्यशाळा, फेसबुक लाइव्ह व झूमच्या माध्यमातून राज्यातील विद्यार्थ्यांसाठी नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली.
कार्यशाळेत त्यांनी मुलांना कमळ, मासा, फुलपाखरू, बेडूक, पाकीट, होडी कसी बनवायची? याविषयी मार्गदर्शन केले. मुलांनीही याच पद्धतीने कागदाच्या वस्तू तयार करून दाखविल्या. मुलांना कागद कामासाठी कोणते साहित्य आवश्यक असते. ते कसे वापरायचे याविषयी त्यांनी सूचना दिल्या. विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेस भरभरून प्रतिसाद दिला. अत्यंत कमी खर्चिक साधनांचा वापर करत विविध वस्तू तयार करण्याची हातोटी दिसून आली.
कार्यशाळेचे समूह संयोजक सूत्रसंचालन निलेश दौंड व सुशीला गुंड यांनी केले. प्रास्ताविक राज्य संयोजक नवनाथ सूर्यवंशी यांनी केले. राज्य संयोजक सुदाम साळुंके आणि कार्यशाळेच्या कल्पकतेबद्दल व भरभरून विद्यार्थी प्रतिसादाबद्दल अधिव्याख्याते संतोष दौंड, तंत्रस्नेही शिक्षक बालाजी नाईकवाडी व सुनीता इंगळे यांनी मत मांडून आनंद व्यक्त केला.
कार्यशाळा यशस्वीतेसाठी राज्य सहसंयोजक कैलास भागवत, राजेंद्र पोटे, निलेश दौंड, संतोष दौंड, अकबर शेख, शबाना तांबोळी, मनीषा पांढरे, सुशीला गुंड, वैशाली भामरे व अशोक शेटे यांनी प्रयत्न केले.