लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : पतीचा आधार नसताना धुणी-भांडी करून पत्र्याच्या छोट्या घरात दोन मुले लहानाची मोठी केली. त्यांना चांगले संस्कार व शिक्षण दिले. त्यातील एका मुलाने नुकतेच इंजिनिअरिंगचे शिक्षण पुणे केले, तर दुसरा मुलगा पदवीचे अंतिम वर्षाचे शिक्षण घेत आहे. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण देणाऱ्या कोपरगाव शहरातील शारदा रामदास माहुलकर यांच्या संघर्षमय जीवनाची जागतिक महिला दिनी
‘लोकमत’ ने घेतलेली दखल.
कोपरगाव शहरातील एका उपनगरात आई वत्सला सावंत यांच्यासमवेत राहणाऱ्या एकुलत्या एक शारदा माहुलकर यांचे नाशिक येथील रामदास माहुलकर यांच्याशी विवाह झाला. काही दिवस दोघांचा प्रपंच सुखात चालला. कालांतराने पतीच्या व्यसनाधिनतनेे काही वर्षांत दोघांचे नाते संपुष्टात आले. त्यानंतर शारदाताई मुलांना घेऊन कोपरगाव येथे आपल्या आईच्या घरी कायमच्या आल्या. पुढील काही दिवसांत पती रामदास यांचेही निधन झाले. त्यानंतर आईबरोबर लोकांच्या घरी जाऊन धुणी-भांडी करू लागल्या, त्यातूनच आपल्या प्रपंचाचा गाडा चालवू लागल्या. त्यानंतर काही दिवसांत आईचेदेखील निधन झाले.
दोन्ही मुलेदेखील शाळेत हुशार होती. दोघांनाही चांगले शिक्षण द्यावयाचे, असा त्यांचा ध्यास होता. मोठा मुलगा दिनेश याची स्थापत्य अभियंता होण्याची, तर दुसरा मुलगा करण यालाही वाणिज्य शाखेत पदवीधर होण्याचे स्वप्न होते. कुणाचा आधार नसताना आपल्या दोनही मुलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी शारदाताईंनी आयुष्यात परिश्रम घेतले. त्याचे फलित म्हणून दिनेश याने नुकतेच स्थापत्य अभियंता पदवीचे शिक्षण पूर्ण केले, तर करण हा वाणिज्य शाखेच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे.
...............
माझ्या संघर्षमय जीवनात माझ्या आईने मला खूप साथ दिली. तसेच विमल पुंडे यांच्यासह मी ज्यांच्या घरातील धुणी-भांडी केली. त्या सर्व महिलांनीदेखील मला खूप सहकार्य केले. त्यामुळेच दोनही मुलांना उच्च शिक्षण देऊ शकले.
- शारदा माहुलकर, कोपरगाव