अहमदनगर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे विचार आजही लढण्याची प्रेरणा देतात. देह संपतात. मात्र, विचार कायम राहतात. कॉ. पानसरे, डॉ. दाभोलकर व प्रा. कलबुर्गी यांच्या हत्या म्हणजे येथील व्यवस्थेने जाणीवपूर्वक रचलेला पूर्वनियोजित कट होता, हे आता लपून राहिलेले नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी केले.
शब्दगंध साहित्यिक परिषद आयोजित कॉ. गोविंद पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्काराचे शुक्रवारी नगरमध्ये वितरण झाले. त्यावेळी कांबळे बोलत होते. पाथर्डी तालुक्यातील, जुन्या पिढीतील कम्युनिस्ट चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते कॉ. का. वा. शिरसाठ यांना शब्दगंधच्या वतीने यावर्षीचा कॉ. गोविंद पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष अरुण कडू पाटील, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव कॉ. सुभाष लांडे, भारतीय महिला फेडरेशनच्या राज्य अध्यक्ष प्रा. स्मिता पानसरे, कॉ. बाबा आरगडे, शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सुनील गोसावी, खजिनदार भगवान राऊत उपस्थित होते.
कांबळे पुढे म्हणाले, इथली व्यवस्था विचारांना आणि विचार करणाऱ्या माणसांना खूप घाबरते. ज्यांना ही माणसे आपल्या वाटेतील अडसर वाटतात ती व्यवस्था अशा विचारी माणसांना संपवते. मात्र, विचार कधीच संपू शकत नाहीत. माणसाची स्वप्ने संपवू शकणारी कोणतीही यंत्रणा या जगात अस्तित्वात नाही.
यावेळी प्रा. स्मिता पानसरे, सुभाष लांडे पाटील यांची भाषणे झाली. सुनील गोसावी यांनी प्रास्ताविक केले. शर्मिला गोसावी यांनी सूत्रसंचालन केले, तर भारत गाडेकर यांनी आभार मानले.
---
फोटो- २०शब्दगंध
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार कॉम्रेड का. वा. शिरसाठ यांना ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. समवेत अरुण कडू, सुभाष लांडे, प्रा. स्मिता पानसरे, बाबा आरगडे, राजेंद्र उदागे, सुनील गोसावी, भगवान राऊत.