लॉकडाऊनच्या काळात मागणी घटल्याचा बाऊ करत ज्या खासगी व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर पाडले, त्या सर्व दूध संघांचे ऑडिट करा, प्रत्यक्षात दुधाची मागणी किती घटली होती व त्या प्रमाणात किती दर कमी देण्यात आले याबाबत सखोल चौकशी करा व परिस्थितीचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांची लूटमार करणाऱ्या खासगी व सहकारी दूध संघांवर कठोर कारवाई करा, केलेली लूटमार वसूल करून ती शेतकऱ्यांना परत करा. लॉकडाऊनपूर्वी मिळत असलेला प्रती लिटर ३५ रुपये दर तातडीने सुरू करा. आगामी काळात दूध उत्पादकांची लूटमार करता येणार नाही यासाठी खासगी व सहकारी दूध संघांना लागू होईल असा लूटमार विरोधी कायदा करा. साखर व्यवसायाप्रमाणे दूध व्यवसायाला किमान आधारभावासाठी एफ.आर.पी. व शिल्लक मिळकतीत हक्काच्या वाट्यासाठी रेव्हेन्यू शेअरिंग असे कायदेशीर दुहेरी संरक्षण लागू करा. अनिष्ट ब्रँड वॉर रोखण्यासाठी एक राज्य एक ब्रँड धोरण स्वीकारा. दूध भेसळ बंद करा. भेसळ विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करून ग्राहकांना शुद्ध दूध रास्त दरात उपलब्ध होईल, याची कायदेशीर हमी द्या. या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.
....................
अंबड, कोतूळ येथेही निदर्शने
अकोले तालुक्यातील अंबड व कोतुळ येथे शेतकऱ्यांनी दूध संकलन केंद्रावर तीव्र निदर्शने करत सरकारला दुधाचा अभिषेक घातला. दुपारी अकोले तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. खरीप हंगामाच्या दृष्टीने खते, बियाणे, कर्ज, वीज व विमा याबद्दलच्या प्रश्नांनाही यावेळी वाचा फोडण्यात आली. डॉ. अशोक ढवळे, किसन गुजर, जे. पी. गावित, अर्जुन आडे, उमेश देशमुख व डॉ. अजित नवले यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. अकोले येथे झालेल्या आंदोलनात डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, एकनाथ मेंगाळ, सुरेश भोर, प्रकाश साबळे, आदी कार्यकर्ते सामील झाले होते.
१७ दूध आंदोलन