कर्जत : कर्जत तालुक्यातील निंबोडी येथून शेळ्या चोरताना शेतकऱ्यांवर गोळीबार केल्याप्रकरणी फरार असलेल्या एका आरोपीला कर्जत पोलिसांनी अटक केली असून, दुसरा आरोपी फरार आहे. ही घटना १० एप्रिल रोजी घडली होती.
कर्जत तालुक्यातील निंबोडी येथे शेळ्यांची चोरी करताना ग्रामस्थांनी आरडाओरडा केला. यावेळी चोर आणि शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली. आरोपींनी गावठी कट्ट्यामधून गोळीबार केला. खंडू किसन गरड, भरत दिनकर बर्डे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करुन चोरटे पळून गेले होते.
कर्जत पोलीस स्थानकाचे निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी वरिष्ठांच्या सूचनांनुसार कर्जत पोलीस स्थानकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांची पथके तयार केली. अहमदनगर, उस्मानाबाद, सोलापूर, बीड जिल्ह्यांतील रेकॉर्डवरील १००पेक्षा जास्त आरोपी तपासले. चंद्रशेखर यादव, सुरेश माने, अमरजित मोरे यांच्या पथकाने केलेल्या तपासामध्ये हा गुन्हा अमर दत्तू पवार (रा. अरणगाव, ता. जामखेड), करण पंच्याहत्तर काळे (रा. पाथरुड, जि. उस्मानाबाद) यांनी केल्याचे निष्पन्न झाले. आरोपी हे पाथरुड, वडगाव नळी परिसरात फिरत असल्याचे कर्जत पोलीस पथकाला समजले. यावेळी सापळा लावून सदर डोंगरावर आरोपी अमर दत्तू पवार याला अटक केली आहे तर दुसरा आरोपी करण पंच्याहत्तर काळे हा पळून गेला आहे. अमर पवार याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे करत आहेत.
...........
फोटो आहे