अहमदनगर : मराठा समाजाच्या मनाविरुद्ध बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणाऱ्या राज्यातील युती सरकारची मराठा समाजाला आरक्षण देण्याची मानसिकता नाही. ते आरक्षण देऊच शकणार नाहीत. मराठा आरक्षण मिळवायचेच, असा निर्धार करून प्रत्येकाने पेटून उठत रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा. रस्त्यावर उतरून शासनाला धाक दाखविल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, असे सांगत कॉँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी मराठा आरक्षणाचा एल्गार नगर येथे पुकारला. नगर येथे शनिवारी राणे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण मेळावा झाला. आमदार संग्राम जगताप, महापौर अभिषेक कळमकर, ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष सोमनाथ कराळे, अवधूत पवार, संजीव भोर, कृषिराज टकले, राजेंद्र निंबाळकर, शांताराम कुंजीर, प्रवीण कानवडे, कुमार वाकळे, संपत बारस्कर, निखील वारे, स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे यावेळी उपस्थित होते. राणे म्हणाले, मराठा आरक्षणाची भूमिका शासन व समाजासमोर मांडण्यासाठी जिल्हानिहाय मेळावे सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीत सत्तेवर येण्यासाठी युतीचे लोक आरक्षणाचा वायदा जनतेला देत होते, पाया पडत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो लावून मते मागत होते. आता सत्तेवर आल्यानंतर आरक्षणाचा विसर त्यांना पडला असून मंत्रालयात खुर्ची उबविण्यासाठी ते बसले आहेत. राणे समितीच्या अहवालानुसार मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळाले. मात्र, न्यायालयाने त्याला स्थगिती दिली. ती उठविण्यासाठी युती शासन सक्षमपणे बाजू न्यायालयात मांडत नाही. आरएसएसच्या संविधानात आरक्षण हा मुद्दाच नाही. सरकारमधील मंत्री विनोद तावडे यांच्या समितीने आरक्षणासंदर्भात किती बैठका घेतल्या. आरक्षण देणार, हे ते नुसतेच सांगताहेत. पण कधी देणार, हे सांगत नाही. दोन वर्षात आरक्षणाविषयी त्यांनी काय केले. ते मराठा असल्याची लाज वाटते. इतरांच्या आरक्षणाला हात लावण्याची हिंमत यांच्यात नाही, मराठा आरक्षण मात्र काढलं. हे आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी तुमची साथ हवी असल्याची साद राणे यांनी घातली. नकारात्मक नाही तर सकारात्मक होऊन लढायचे. मराठा आरक्षणाच्या लढाईत पेटून उठा, कोणी डिवचलं तर गप्प बसणार नाही, असा इशारा राणे यांनी दिला.आमदार संग्राम जगताप यांनी आरक्षणासाठी राणे यांनी मराठा संघटनांना एकछत्र करण्याचे यशस्वी पाऊल टाकले. मराठ्यांनी एकत्र येऊन रस्त्यावर नुसते उभे राहिले तरी आरक्षण द्यावे लागेल, असे सांगत मुंबईत चक्काजाम आंदोलन करण्याची तयारी दर्शविली. आरक्षणासाठी मराठा समाजाने एक भूमिका घेऊन ठाम रहा. आमचा पाठिंबा असल्याचे आश्वासन जगताप यांनी दिले. महापौर कळमकर, निखील वारे, गजेंद्र दांगट, संतोष गव्हाणे यांनी मनोगत व्यक्त केले. शांताराम कुंजीर यांनी मराठा समाज आरक्षणाची स्थिती मांडली. (प्रतिनिधी)मराठे पेटून का उठत नाहीत...बाबासाहेब पुरंदरे यांना सेनेनेच घराघरात पोहचविले. सेनेने पुरंदरे यांना मोठे केले. मराठा समाजाच्या मनाविरुध्द पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला. कॉ. गोविंद पानसरे यांनी राज्यातील घराघरात खरे शिवाजी पोहचविले. मात्र त्यांना काय मिळालं. गोळ्यांनी संपविलं. पानसरे खून प्रकरणात दोन महिन्यांनी तपास अधिकारी बदलला जातो. ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद सबनीस यांनी पंतप्रधानांविषयी भाष्य केले तर त्यांना सनातनवाल्यांनी धमकी दिली. तुम्ही खुलेआम हे करायचे अन् आम्ही काही बोललं तर जीभ घसरली म्हणायचे. जाट, पटेलांचे आंदोलन पेटते तर मराठे पेटून का उठत नाही, असा सवाल करत राणे यांनी तरुणांना पेटून उठण्याचे आवाहन केले. अनेक महापुरुषांची एकच जयंती साजरी होते. मग छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दोनदा का? असा सवाल करत सेनेने अन्य महापुरुषांच्या जयंती तिथीनुसार साजरी करण्याची हिंमत दाखवावी. ते फक्त शिवाजी महाराजांची बदनामी करताहेत. बदनामी करणाऱ्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. त्यावेळी आम्ही गप्प कसे बसणार, असे सांगत राणे यांनी सेनेवर टीका केली.
आरक्षणाच्या ध्येयाने पेटून उठा
By admin | Updated: May 28, 2016 23:44 IST