अहमदनगर : केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात घरगुती गॅस सिलिंडरची किंमत दहा रुपयांनी कमी केली. या निर्णयाचे स्वागत होण्याऐवजी सोशल मीडियावर खिल्लीच उडविण्यात आली. अनेकांना तर हा दिलासा आहे की विनोद ? असाच सवाल उपस्थित केला आहे. गेल्या सहा महिन्यांत दोनशेपेक्षा जास्त रुपयांनी गॅस महाग केला आणि दहा रुपयांच्या सवलतीने गृहिणींनी संताप व्यक्त केला आहे.
पूर्वी चूल ‘किंवा‘स्टोव्ह’वरच स्वयंपाक केला जायचा. कालांतराने मात्र राॅकेलचा तुटवडा निर्माण झाला आणि लाकूडदेखील मिळेनासे झाल्याने स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडरचा वापर सुरू झाला. त्याचे दरही सर्वसामान्य कुटुंबांच्या आवाक्यात होते. मात्र, वर्षभरापासून सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ झाली. टप्प्याटप्प्याने पूर्वी असलेल्या दरात मार्च २०२१ पर्यंत तब्बल २२५ रुपये वाढविण्यात आले. यामुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले. प्रचंड प्रमाणात झालेली दरवाढ मागे घेण्याऐवजी शासनाने केवळ १० रुपये कमी करून तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे.
.................
असे वाढले दर
नोव्हेंबर २०२० - ६१४
डिसेंबर २०२० - ६६४
जानेवारी २०२१ - ७१४
फेब्रुवारी २०२१ - ७३२
मार्च २०२१ - ७८२
एप्रिल २०२१ - ८३२
................
केंद्र सरकारने सामान्य कुटुंबांची दैना करून टाकली आहे. स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस सिलिंडरच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आणि आता केवळ १० रुपये कमी करून तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार करण्यात आला.
- छाया अनिल सुद्रिक
................
चुलीवर स्वयंपाक करणे आता पूर्णत: अशक्यच आहे. त्यामुळे प्रचंड प्रमाणात भाववाढ झाली तरी काटकसर करून सिलिंडरवरच स्वयंपाक करावा लागतो. शासनाने ही बाब लक्षात घेऊन वाढविले, त्याच प्रमाणात दर कमी करावे.
- नीता अशोक गायकवाड
.............
दिवसभर मोलमजुरी करून दोन वेळच्या जेवणाची सोय करणाऱ्या कुटुंबांना गॅस सिलिंडरचे वाढीव दर झेपणे कठीण झाले आहे. असे असताना कुठलाच विचार न करता केवळ १० रुपये कमी करण्यात आले. शासनाचा हा कारभार चिंता वाढविणारा आहे.
- अश्विनी अविनाश झिकरे
................
वर्षभरात महागले गॅस सिलिंडर
साधारणत: फेब्रुवारी-मार्च २०२० पासून सर्वत्र कोरोना विषाणू संसर्गाचा उद्रेक व्हायला लागला. तेव्हापासूनच गॅस सिलिंडरचे दरही महिनागणिक वाढत गेले. प्रत्येक महिन्यात ५० ते ६० रुपयांनी हे दर वाढविण्यात आले आणि दर कमी करताना केवळ १० रुपये कमी झाले. त्यामुळे दहा रुपये वगळता २२५ रुपयांनी सिलिंडर महागले असल्याचे दिसते.
--------------
डमी
०२ गॅस रेट डमी
गॅस