भेंडा : महानगराप्रमाणे ग्रामीण भागातही कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. निमशहरी गावे निर्मलग्राम होत आहेत, ही चांगली बाब आहे. परंतु गावातील कचरा रस्त्याच्या कडेला टाकून नागरिक व स्थानिक स्वराज्य संस्था आपली जबाबदारी झटकून टाकत आहेत.
नेवासा तालुक्यातील पांढरी पूल, घोडेगाव, वडाळा बहिरोबा, नेवासा फाटा, प्रवरासंगम, भेंडा, कुकाणा, सोनई यासह इतर गावांतील कचऱ्याची समस्या थोड्याफार फरकाने सारखीच आहे. गावातील व्यावसायिक, हाॅटेल चालक, धाबेवाले, मंगल कार्यालय येथून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट गावाच्या बाहेर रस्त्याच्या कडेला किंवा जंगलात टाकून करतात.
हाॅटेल, मंगल कार्यालय व इतर व्यावसायिक कचरा गोणी किंवा प्लास्टिक थैलीत बांधून फेकून देतात. या कचऱ्यावर जनावरे, कुत्रे, डुक्कर ताव मारतात. हे प्राणी रस्त्यावरून जाणाऱ्या मोठ्या वाहनांना धडकून मरतात. परंतु, दुचाकीला धडकून अपघात होतात. यात काही लोकांचा जीव गेला. काही जखमी झाले. कचरा वेचून उपजीविका करणारे काही लोक असतात. त्यांना हव्या त्या वस्तू ते वेचतात. काही ठिकाणी कचऱ्यात काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात सापडतात. त्याचा त्रास या भागातील शेतकऱ्यांना होतो. गावाच्या स्वच्छतेसोबत यापुढे त्या गावाच्या हद्दीतील रस्ते संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, समाजसेवी संस्था, संघटनेने घेतल्यास रस्ते स्वच्छ राहतील.