कोपरगाव : ब्रम्हलीन गंगागिरी महाराजांचा सत्संग सप्ताहाच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचला असून नारायणगिरी महाराजांनी सामूहिक नामस्मरण भक्तीतून वैयक्तिक भक्तीकडे जाण्याचा मार्ग दाखवला, तर महंत रामगिरी महाराज यांनी त्याची व्याप्ती वाढवून कोरोना महामारीत मनुष्याची आध्यात्मिक बांधणी करत आहे. गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाची गोडी सर्वसामान्यांच्या वैचारिक विचारधारेची जडणघडण मजबूत करणारी असल्याचे असल्याचे भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी म्हटले.
श्रीरामपूर तालुक्यातील श्रीक्षेत्र सरला बेट येथे १७४ व्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास स्नेहलता कोल्हे यांनी भेट दिली.
कोल्हे म्हणाल्या, श्रीक्षेत्र सरला बेटाच्या विकासात भर घालण्याचे काम महंत रामगिरी महाराज यांनी केले असून त्यांची आध्यात्मिक विचारांची देवाण-घेवाण व्यापक आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीत गंगागिरी महाराजांच्या सप्ताहातील विचार मानवाला धीर देणारे असून संकट काळात नामस्मरण भक्तीच आपल्याला तारून नेत असते. महंत रामगिरी महाराज यांनी या वैश्विक महामारी संकटाला वैद्यकीय उपचार याबरोबरच आध्यात्मिक उपचाराने कसे सामोरे जायचे याबाबतचे संपूर्ण सप्ताहभर विवेचन करून मानवाला एक मार्ग दाखवला आहे. ज्ञानेश्वर परजणे यांनी आभार मानले.