अहमदनगर : स्त्रीमध्ये असणाऱ्या अखंड उर्जेचा समाजाने कधी सुयोग्य वापर केला नाही. जगाची जननी असूनही तिला दुय्यम स्थान देण्यात आले. त्यामुळे संपूर्ण महिला पुढाकाराने मूर्त स्वरुपात आलेली ‘ती’चा गणपती ही अभिनव संकल्पना समाजात होत असणाऱ्या सकारात्मक बदलाचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन शारदा पोखरकर यांनी ‘ती’चा गणपतीच्या आरतीच्या वेळी केले.महिलांच्या सृजनशीलता आणि नवनिर्मितीच्या क्षमतेला समाजासमोर आणण्यासाठी ‘लोकमत’ने अनोख्या उपक्रमाचा प्रारंभ केला आहे. अशा या प्रेरणादायी ‘ती’च्या गणपतीची आरती करण्यासाठी शारदा पोखरकर, डॉ.कीर्ती कोल्हे, कविता पानसरे अशा मान्यवर महिलांची उपस्थिती लाभली. तुमच्या गणेशोत्सव मंडळात ‘ती’चा गणपतीसारखा उपक्रम राबविण्यात येत असल्यास महिला आरती करत असलेले छायाचित्र लोकमत इव्हेंट विभाग, लोकमत भवन, अहमदनगर येथे पाठवावे.