अहमदनगर: नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीमध्ये विद्यमान अध्यक्ष खासदार दिलीप गांधी-सुवालाल गुंदेचा यांच्या सहकार पॅनलचे सर्वच्या सर्व १८ उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत विरोधकांचे जनसेवा पॅनल भुईसपाट झाले. सहकारचे सर्व उमेदवार आठ हजार मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत.नगर अर्बन बँकेच्या मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया पार पाडल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय निबंधक संजीव खडके यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. या सभेमध्ये खडके यांनी निवडणुकीचा निकाल जाहीर केला. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मनोज गायकवाड, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन गांधी यांच्यासह नवनिर्वाचित संचालक आणि सभासद उपस्थित होते. (प्रतिनिधी)गांधी अध्यक्ष, कासट उपाध्यक्षअहमदनगर : नगर अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी खासदार दिलीप गांधी यांची, तर उपाध्यक्षपदी संगमनेरचे राधावल्लभ कासट यांची एकमताने निवड झाली. मल्टीस्टेट कायद्यानुसार अध्यक्ष-उपाध्यक्षांची ही निवड पाच वर्षांसाठी असणार आहे. बँकेचा निकाल अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी संजीव खडके यांनी नगर अर्बन बँकेच्या सभागृहात संचालकांची बैठक बोलविली. या बैठकीत एकमताने ही निवड झाली. बँकेच्या अध्यक्षपदासाठी खासदार दिलीप गांधी यांच्या नावाची सूचना ज्येष्ठ संचालक सुवालाल गुंदेचा यांनी मांडली. त्याला संचालक अनिल कोठारी यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी संचालक राधावल्लभ कासट यांच्या नावाची सूचना शैलेश मुनोत यांनी मांडली. त्याला संचालक दीपक गांधी यांनी अनुमोदन दिले.
गांधी-गुंदेचा पुन्हा सत्ताधारी, विरोधक भुईसपाट
By admin | Updated: December 11, 2014 00:40 IST