दहिगावने : यावर्षी झालेल्या अतिरिक्त पावसाने शेतीत बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव अधिक आढळून येत आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होऊ शकते. हे टाळण्यासाठी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसताच शेतकऱ्यांनी कॉपर ऑक्सिक्लोराइड / एम ४५ ची फवारणी घ्यावी व या रोगाचा वेळीच बंदोबस्त करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप यांनी केले.
राज्य शासन कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र दहिगावने यांच्या संयुक्त विद्यमाने दहिगावने (ता. शेवगाव) येथील जिल्हा मासिक चर्चासत्र प्रसंगी ते बोलत होते. चर्चासत्रासाठी उपस्थित अधिकाऱ्यांनी दहिगावने कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रांवर भेट देत ओवा, फळपीक, रोपवाटिका, हंगामी पिकांची पाहणी करत चर्चा केली. भावीनिमगाव येथील युवा प्रगतशील शेतकरी नामदेव चेडे यांच्या शेतीला भेट देऊन ते आपल्या शेतात करत असलेल्या पीक व्यवस्थापनाची माहिती घेतली. चेडे यांच्या किसान कृषी विकास प्रोड्युसर कंपनीच्या सेंद्रिय आठवडाबाजार संकल्पनेचे उद्घाटन केले.
रांजणी येथील संदीप आगळे, संजय तनपुरे यांच्या गांडूळ खत प्रकल्पाला भेट दिली.
यावेळी कृषी उपसंचालक विलास नलगे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक राजाराम गायकवाड, अनिल गवळी, उपविभागीय कृषी अधिकारी संजय काचोळे, सुधाकर वऱ्हाळे, गहिनीनाथ कापसे, राहुरी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. देसाई, डॉ. वाळुंज, केव्हीकेचे प्रमुख डॉ. श्यामसुंदर कौशिक, शेवगाव तालुका कृषी अधिकारी किरण मोरे, डी.पी. डमाळ, प्रवीण भोर, सुधीर शिंदे, डी.टी. सुपेकर, अशोक आढाव, अंकुश टकले, बापूसाहेब शिंदे, प्रगत शेतकरी सोपान चेडे आदी उपस्थित होते. कृषी मंडलाधिकारी कानिफनाथ मरकड यांनी आभार मानले.
फोटो ३० दहिगावने
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी भावीनिमगाव येथील प्रगतशील शेतकरी नामदेव चेडे यांच्या शेतात भेट देऊन पिकाची पाहणी केली.