अहमदनगर : ‘राजमोती एक्स्ट्रूजन’च्या माध्यमातून अॅल्युमिनिअम साहित्याच्या क्षेत्रात देशभर आपली ओळख निर्माण केलेले येथील प्रसिद्ध उद्योगपती वीरेंद्र मोतीलाल लोढा (वय ५१) यांचे शुक्रवारी सायंकाळी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.लोढा हे येथील गोटमल अमरचंद लोढा परिवाराचे सदस्य होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी स्मिता, मुलगा मोनिश, मुलगी निकिता, बंधू महेंद्र, सुरेंद्र व निखिलेंद्र, दोन बहिणी असा मोठा परिवार आहे. साहसी, विनम्र व प्रेमळ स्वभावाचे उद्योजक म्हणून ते परिचित होते. गल अलॉइज व राजमोती एक्स्ट्रूजनच्या माध्यमातून त्यांनी उद्योग जगतात मोठी भरारी घेतली होती. शनिवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत महापौर अभिषेक कळमकर, आमदार संग्राम जगताप यांसह उद्योग क्षेत्रातील राज्यभरातील अनेक मान्यवर सहभागी झाले होते. ‘लोकमत’एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व खासदार विजय दर्डा यांनी लोढा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करुन परिवाराला आपल्या शोकसंवेदना कळविल्या आहेत. (प्रतिनिधी)
उद्योगपती वीरेंद्र लोढा यांच्यावर अंत्यसंस्कार
By admin | Updated: May 8, 2016 00:53 IST