शनिवारी रात्री दहा वाजेच्या दरम्यान एका हॉटेलजवळ हा टँकर उभा होता. काही स्थानिकांनी चालकाकडे चौकशी केली असता त्याने संदिग्ध माहिती दिली. त्यामुळे पोलिसांना कळविण्यात आले. घारगाव पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक धीरज राऊत यांनी घटनास्थळी धाव घेतली. राऊत यांनी कारखाना व्यवस्थापनाशी चर्चा केल्यानंतर टँकर कारखान्याच्या आवारात लावण्यात आला.
कारखान्याने आपल्या वाहनांकरिता हे बायोडिझेल मागविले होते. मात्र, शनिवारी व रविवार हे दोन दिवस सुट्टी असल्याने कारखान्याची वाहने बंद होती. त्यामुळे मुंबई येथील बायोडिझेलची ही ऑर्डर कारखान्याने रद्द केली होती. त्याबदल्यात दुसऱ्या एका तेल कंपनीचा डिझेलचा टँकर व्यवस्थापनाने मागविला होता, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.
मात्र, टँकरमधील इंधन नेमके कोणते आहे? कारखान्याने मागविला असल्यास तो परिसरात का उभा राहिला? अशा काही शंका स्थानिकांनी व्यक्त केल्या. टँकरचे काही व्हिडिओ चित्रण स्थानिकांनी केले आहे.
...
अहवाल लवकरच मिळेल
तहसीलदार अमोल निकम यांच्या आदेशानंतर रविवारी सायंकाळी टँकरमधील इंधनाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. पुरवठा अधिकाऱ्यांनी हे नुमने घेतले असून, त्याचा अहवाल लवकरच मिळेल, असे निकम यांनी ‘लोकमत’ला सांगितले. श्रीरामपूर येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना याबाबतची माहिती दिल्याचे उपनिरीक्षक राऊत यांनी सांगितले.