अहमदनगर : नगर शहरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक शाळकरी मुले जखमी झाली आहेत़ त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वारंवार करुनही महापालिका प्रशासन दखल घेत नाही़. त्यामुळे सोमवारी प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस निखिल वारे यांच्या नेतृत्वाखाली शाळकरी मुलांनी थेट महापालिकेवर मोर्चा नेला़ महापालिकेने वेळेत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक विद्यार्थी जखमी होऊनसुद्धा महापालिका प्रशासन भटक्या कुत्र्यांच्या उपाययोजनेबाबत करण्यात असफल झाले आहेत. अखेर शालेय विद्यार्थीच महापालिकेत मोर्चा घेऊन गेले आणि प्रशासनाला भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात जाब विचारला. या चिमुकल्या मुलांच्या घोषणांनी महापालिका परिसर दणाणून गेला होता. मुलांनी महापालिकेत येऊन खेळ-खेळत आणि एक लहान कुत्र्याचे पिल्लू महापालिकेत आणून सोडत मनपा प्रशासनाचा अनोखा निषेध केला. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा महापालिका कार्यालयात कुत्रे बांधू, असा इशारा प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस निखिल वारे यांनी दिला.
भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा नगर महापालिकेवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 13:30 IST