संगमनेर : धनगर समाजाचा आदिवासी जमातीत समावेश करू नये, या मागणीसाठी आदिवासी बचाओ समितीच्या वतीने शनिवारी प्रांत कार्यालयावर मोर्चा नेवून तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. शनिवारी दुपारी एक वाजता शहरातील नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून आदिवासी समाजाचा मोर्चा निघाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर हा मोर्चा प्रांत कार्यालयावर जावून धडकला. या ठिकाणी झालेल्या निषेध सभेद्वारे सर्वच वत्यांनी धनगर समाजाचा समावेश आदिवासी सूचीत करण्यास नकार दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनगर समाजास पाठींबा दिल्याने त्यांचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला. आदिवासींच्या आरक्षणात कोणत्याही जातीचा समावेश करू नये, समाजाची जातवार जनगणना करून वाढीव आरक्षण मिळावे, पिचड यांची बदनामी करणाऱ्यांवर ‘अॅट्रॉसिटी’चे गुन्हे दाखल करावेत, अशा मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. आघाडी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चेकऱ्यांचे निवेदन शिरस्तेदार सुरेश भालेराव व नायब तहसीलदार अमोल मोरे यांनी स्वीकारले. भर उन्हात दिड तास चाललेल्या सभेस सोमनाथ मेंगाळ, दशरथ गायकवाड, रोहीदास कौटे, मंजाबापू साळवे, महादू गोंदे, डॉ. लोहकरे, कुंडलीक भांगरे, विनायक भोईर, राजेंद्र मेढे, संजय मेढे, विजय आंबेकर, रामनाथ लहांगे, शिवाजी उंबरे, किसन मुठे, सोमनाथ मधे आदींसह आदीवासी महीला, पुरूष, विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी) राष्ट्रवादीच्या भूमिकेने पिचड यांची गोचीधनगर समाजाच्या आरक्षणास पाठिंबा देणारे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेचा तीव्र निषेध करून प्रचंड घोषणाबाजी झाल्याने आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांची भलतीच गोची झाली. आदिवासी बचाओ समिती आयोजित मोर्चात आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांच्या अनुपस्थितीचीच चर्चा रंगली.
आदिवासी बचाओ समितीचा मोर्चा
By admin | Updated: August 17, 2014 00:03 IST