वाकचौरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र दिले असून त्यात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्ह्यात पहिली ते आठवीचे एकूण ४ लाख ६३ हजार ९६१ विद्यार्थी आहेत. या सर्वांना नोव्हेंबर २०२० पासून शालेय पोषण आहार मिळालेला नाही. महाराष्ट्रमध्ये फक्त अहमदनगर जिल्ह्यामध्येच अशी स्थिती आहे. शालेय पोषण आहार पुरवठा करण्यामध्ये अहमदनगर जिल्हा परिषदेने दिरंगाई केली आहे. त्यामुळे हे सर्व विद्यार्थी आहारापासून वंचित राहिले आहेत. आरटीई कायद्यानुसार जितके दिवस या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळाला नाही, त्याची भरपाई महाराष्ट्र शासन तसेच अहमदनगर जिल्हा परिषदेने करावी व वंचित विद्यार्थ्यांना न्याय मिळावा. शालेय पोषण आहारामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार शाळेत न देता त्या स्वरूपात देण्यात येणारी रक्कम विद्यार्थ्यांच्या बचत खात्यामध्ये डीबीटीने वर्ग करावी. जेणेकरून त्या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना होईल, असेही वाकचौरे यांनी पत्रात म्हटले आहे.
जिल्ह्यात साडेचार लाख विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:25 IST