ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. २७ - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे पुत्र व माजी आमदार शंकरराव गडाख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले हे नेवासा तालुक्यातील विद्यमान भाजपा आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्याशी साटेलोटे करून तालुक्याच्या राजकारणात हस्तक्षेप करत आहेत, असा गडाख समर्थकांचा आरोप आहे. नेवासा तालुक्यात भेंडा व कुकाणा या दोन जिल्हा परिषद गटात आपल्या दोन समर्थकांना राष्ट्रवादीकडून उभे करून आमदार मुरकुटे यांच्या छुप्या मदतीने त्यांना निवडून आणायचे अशी घुले यांची खेळी आहे. त्यामुळेच गडाख नाराज असून, त्यांनी सोनई येथे आज मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त करणारी भाषणे सुरू आहेत़ मेळाव्यात यशवंतराव गडाख हे देखील शेवटी भाषण करण्याची शक्यता आहे. गडाखांचा राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय जवळपास नक्की असून, ते तिसरी आघाडी करून ही जिल्हा परिषद निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे़ राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.