सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने पॅरासिटामॉल औषध निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले असून त्याच्या अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळेच्या उद्घाटनच्या निमित्त साखर आयुक्त गायकवाड बुधवारी संजीवनी कारखाना कार्यस्थळी आले होते. त्याप्रसंगी शंकरराव कोल्हे यांच्याशी यांनी वार्तालाप साधला. याप्रसंगी अध्यक्ष बिपीन कोल्हे, तज्ज्ञ संचालक विवेक कोल्हे, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजी दिवटे उपस्थित होते.
कोल्हे म्हणाले, ग्रामीण अर्थकारणाची जननी सहकार आहे. त्याच्या नेतृत्वाने असंख्य असामान्य कामे सक्षमपणे उभी राहिली आहेत. सहकार चळवळ उभारली, शेतकरीवर्गांसह सर्वसामान्यांच्या छोट्या-मोठ्या दैनंदिन गरजा सुटल्या. चालू गळीत हंगामात अतिरिक्त साखर उत्पादन होणार असून त्याच्या गाळपाची काय व्यवस्था आहे. यावर्षी साखर मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे. त्यातच गेल्यावर्षीचा साखरेचा साठा गोदामात पडून आहे. त्यावर व्याजाचा भुर्दंड कारखान्यांना सोसावा लागत आहे. साखरेचा उत्पादन खर्च आणि त्या प्रमाणात मिळत असलेला दर याचा ताळमेळ एकरकमी एफआरपी देताना बसत नाही. कारखान्यांना त्यासाठीची आर्थिक तरतूद करताना तारेवरची कसरत करावी लागते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः केंद्रीय पातळीवर सहकार मंत्रालय विभागाची स्वतंत्र निर्मिती केली, हे योग्य पाऊल असून साखर उद्योगाच्या भवितव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढवून त्याचे दर वाढवले म्हणून सहकारातील काही कारखाने आज तग धरून आहेत. मात्र, हे प्रमाण आणखी वाढवले तर त्यातून साखर कारखान्यांचे आर्थिक प्रश्न सुटू शकतील.
..................
फोटो०८- कोल्हे साखर आयुक्त संवाद - कोपरगाव