ढवळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील वडगाव शिंदोडी येथील गट क्रमांक एकमधील वनविभागाच्या जमिनीवर तीन वर्षांपूर्वी वृक्षारोपण करून फुलविण्यात आलेली वनराई आता पोरकी झाली आहे. वनविभागाचे दुर्लक्ष झाल्याने येथे शेळ्या, मेंढ्या, जनावरे सर्रास चरताना दिसतात, असे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे. येथील झाडे वाचवा, अशी मागणी निसर्गप्रेमी वनविभागाकडे करीत आहे.
तत्कालीन वनरक्षक संदीप भोसले यांनी येथे वृक्षारोपण करून उत्कृष्ट असे काम आणि अपार कष्ट करून या वनराईचे संगोपन केले होते. त्यांचे त्यावेळी कौतुकही झाले होते. दुष्काळसदृश्य परिस्थिती असताना, टँकरद्वारे पाणी देऊन ही वनराई त्यांनी फुलविली, जगविली होती. येथे वन्यप्राण्यांसाठीही काही झाडे लावण्यात आली होती. सशांना खाण्यासाठी त्यांनी गवताच्या बिया टाकल्या होत्या.
गेल्या सहा-सात महिन्यांपूर्वी भोसले यांना पद्दोन्नती मिळाली. येथून त्यांची बदली झाली. त्यानंतर, वनविभागाचे याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे वडगाव शिंदोडी येथील वनराई पोरकी झाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. आर्थिक देवाण-घेवाण करत या वनक्षेत्रात चराई सुरू असल्याची गावातील नागरिकांमध्ये चर्चा ऐकायला मिळत आहे.
सध्या या वनराईमध्ये शेळ्या मेंढ्या व जनावरे चरताना दिसतात. या वनक्षेत्रामध्ये शिकारीचे प्रमाणही वाढल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. येथील अवैध चराई व शिकारीला आळा घातला नाही, तर श्रीगोंदा येथे वनक्षेत्रपाल यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
-----
वडगाव शिंदोडी येथील वनराईमध्ये चराई बंदी आहे, तरीही नजर चुकवून कोणी चराई करत असेल, तर त्यांच्या दंडात्मक कार्यवाही केली जाईल. जंगलाचे संगोपन चांगल्या पद्धतीने केले जाईल. वनरक्षक, वनकर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पाठविले आहे.
- यू.एम. पोतकुले,
वनपरिमंडल अधिकारी
------
११ वडगाव शिंदोडी
वडगाव शिंदोडी येथील फुललेली वनराई.