नगर शहरात उभारण्यात आलेल्या एम्स हॉस्पिटलमध्ये मशीनरी खरेदीसाठी डॉ. नीलेश शेळके याने बँकेच्या संचालक मंडळाशी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर कर्ज मंजूर करून आर्थिक फसवणूक केली, अशा प्रकारची फिर्याद राहुरी येथील डॉ. रोहिणी भास्कर सिनारे, श्रीरामपूर येथील डॉ. उज्ज्वला रवींद्र कवडे व नगरमधील डॉ. विनोद अण्णासाहेब श्रीखंडे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात सप्टेंबर २०१८ मध्ये दाखल केली होती. या तिघांची प्रत्येकी ५ कोटी ७५ लाख रुपयांची फसवणूक झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले होते. त्यानुसार डॉ. शेळके याच्यासह बँकेचे संचालक मंडळ, अधिकारी व मशीनरी वितरकांविरोधात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले होते. हे प्रकरण पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. हा गुन्हा क्लिस्ट स्वरूपाचा असल्याने अपहार नेमका कसा झाला, पैसे कुठे गेले, दोषी नेमके कोण आदी बाबी शोधण्यासाठी दीड वर्षांपूर्वी फॉरेन्सिक ऑडिटरची नेमणूक करण्यात आली होती. काेरोनामुळे मात्र फॉरेन्सिक ऑडिटचे काम पूर्ण झाले नव्हते. आता नुकतेच ऑडिट पूर्ण झाले असून आठवडाभरात अंतिम अहवाल मिळणार असल्याचे तपासी अधिकारी यांनी सांगितले.
----------------------------------
पुरवणी दोषारोेपपत्रात कुणाचा नंबर
शहर बँकेतील अपहारप्रकरणी तिन्ही गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने मुख्य आरोपी डॉ. नीलेश शेळके याच्याविरोधात तीन स्वतंत्र दोषारोपपत्र दाखल केले आहे. या गुन्ह्यात मात्र एकूण २५ आरोपींचा समावेश आहे. फॉरेन्सिक ऑडिटमध्ये जे दोषी आढळून येतील त्यांच्याविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे. त्यामुळे गुन्हा दाखल असलेल्यांपैकी अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
----------------------