वर्षभरापूर्वी राहुल दळवी यांच्या वडिलांचे निधन झाले. वडील सार्वजनिक गणेशोत्सव, दुर्गा उत्सव, शिवजयंती व विविध धार्मिक उत्सवामध्ये हिरिरीने सहभाग घेऊन सामाजिक बांधीलकी जोपासत असत. त्यामुळेच मुलगा राहुल व त्यांच्या कुटुंबीयांनी वडिलांच्या प्रथम स्मृतिप्रीत्यर्थ समाजाकडून नेहमीच अवहेलना होत असलेल्या फासे पारधी बालकांसाठी अन्नदान करून या बालकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविला. नारायणडोहो शिवारातील तळ्याचा मळा येथील पारधी वस्तीवर जाऊन त्यांनी पारधी शाळेतील मुलांना अन्नदान केले. याप्रसंगी राजू दळवी, विजय दळवी, अक्षय दळवी व कुटुंबीय हजर होते. उपेक्षित, वंचित, भटक्या समाजातील बालकांच्या शिक्षणासाठी कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते युवराज गुंड यांच्या मार्गदर्शनाने हा उपक्रम झाला. बायडाबाई चव्हाण, तुषार चव्हाण, मीनाबाई काळे, अक्षय काळे, संदीप आवारे यांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
--------