तिसगाव : शेवगाव व पाथर्डी तालुक्यात संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाढता फैलाव रोखण्यासाठी हॉटस्पॉट झालेल्या गावांमध्ये तातडीने युद्धपातळीवर तपासणी करून बाधित रुग्ण शोध व त्यांचे विलगीकरण करण्यासाठी व कोरोना साखळी तोडण्यासाठी आरोग्य विभागाकडे कोरोना चाचणी कीट उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. त्यासाठी आमदार मोनिका राजळे यांनी मढीच्या कानिफनाथ देवस्थान ट्रस्टला पाथर्डी व शेवगाव तालुक्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट देण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार कानिफनाथ देवस्थान ट्रस्टने पाच हजार कीट प्रशासनाकडे सुपूर्द केल्या.
मढी देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड यांच्या हस्ते प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांच्याकडे या कोरोना चाचणी कीट पाथर्डी तहसील कार्यालयात सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी तहसीलदार शाम वाडकर, नायब तहसीलदार पंकज नेवसे, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, आमदार मोनिका राजळे यांचे स्वीय सहाय्यक सुरेश बाबर, भाजपचे तालुका उपाध्यक्ष गोकुळ दौंड, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, मढी देवस्थानचे कोषाध्यक्ष राधाकिसन मरकड, विश्वस्त तथा उपसरपंच रवींद्र आरोळे, आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक कराळे, अजय भंडारी, सुभाष केकाण, भाग्येश मरकड, भानुदास मरकड, बाबासाहेब मरकड, अविनाश मरकड, पाराजी मरकड, देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पवार आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांना सॅनिटायझर, मास्क, फेस शेड पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.