अहमदनगर: चारचाकी, सोन्याचे दागिने लुटणाऱ्या संजय नागराज काळे आणि अक्षय बाबासाहेब पिंपळे या दोन आरोपींना तोफखाना पोलिसांनी अटक केली होती. दोन्ही आरोपींकडून शिर्डी, चिपळूण, कोपरगाव, पुणतांबा, भांबोरा,सांगली येथे झालेले जबरी चोरी,लूट, मारहाणीचे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच त्यांच्या साथीदारांविरुद्ध मालमत्तेचे अनेक गुन्हे दाखल असल्याने अटक करण्यात आलेली टोळी सराईत असल्याचे स्पष्ट झाले आहे.सावेडी भागातील पिटर इंग्लंड या दुकानातून सात लाख रुपयांचे तयार कपडे चोरीला गेले होते. या गुन्ह्याच्या तपास करीत असताना या दुकानातील चोरी केल्याच्या संशयावरून तोफखाना पोलिसांनी संजय नागराज काळे (वय २३, रा. बाजारतळ, राहाता) आणि अक्षय बाबासाहेब पिंपळे (रा. अशोकनगर, ता. श्रीरामपूर) यांना २५ सप्टेंबरला अटक केली होती. त्यांना न्यायालयाने एक आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.पोलीस कोठडीमध्ये दोन्ही चोरट्यांनी अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. गतवर्षी शिर्डी येथून धुळे पासिंगची महिंद्रा व्हेरिटो ही गाडी चोरली होती. या गाडीची नंबर प्लेट बदलून चिपळूण, जि. रत्नागिरी येथे एका कॉम्प्लेक्समधील वॉचमनला मारहाण केली होती. सराफाच्या दुकानातील सुमारे १० लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी केली होती. तसेच जानेवारी २०१४ मध्ये कोपरगाव येथून इंडिका गाडी भाड्याने घेवून राशिन (ता. कर्जत) येथील रेडिमेड कपड्याच्या दुकानातील ५३ हजार रोख व रेडिमेड जिन्स पॅन्ट, शर्ट, वुलन जॅकेटची चोरी केली होती. भांबोरा (ता. कर्जत) येथेही चोरट्यांनी सराफाच्या दुकानातील दीड किलो चांदीचे दागिने चोरले होते. तीन महिन्यापूर्वी पुणतांबा ते कोपरगाव रोडवर साथीदारांच्या मदतीने स्विफ्ट कार चालकाला कट का मारलास असा बहाणा करून कारमधील चालक व इतरांना मारहाण केली व त्यांच्याकडील मोबाईल हॅण्डसेट, लॅपटॉप, रोख रक्कम आणि स्विफ्ट कार बळजबरीने चोरून नेली. ही गाडी घेवून चोरट्यांनी सांगली येथील एका दुकानात चोरी करण्याच्या उद्देशाने गेले होते. मात्र सदरची कार पाण्याच्या चारीत फसल्याने ते कार सोडून पळून गेले. या कारमध्ये पोलिसांना एक गावठी कट्टा, एक छोटी तलवार, चाकू मिळून आला होता. याबाबत सांगली पोलीस ठाण्यात काळे व त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता,अशी माहिती काळे यानेच पोलिसांना दिली आहे. दोन्ही आरोपीविरुद्ध कोपरगाव, कर्जत, सांगली, चिपळूण आदी ठिकाणी गुन्हे दाखल असून त्यांच्या साथीदारांवरही अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस उपअधीक्षक वाय.डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक प्रांजली सोनवणे, पोलीस निरीक्षक एल. बी. काळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र वाघ, संजय इस्सर, शैलेंद्र जावळे, भरत डंगोरे, राम माळी, अभय कदम, सुमित गवळी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. (प्रतिनिधी)
संशयिताने दिली पाच गुन्ह्यांची कबुली
By admin | Updated: September 30, 2014 23:20 IST