कुकाणा : कुकाणा (ता. नेवासा) येथे शनिवारी (दि. २२) ते रविवार (दि. ३०) पर्यंत जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. पहिल्या दिवशी शनिवारी दुकाने वेळेत बंद न करणाऱ्या व्यावसायिकांसह विनाकारण फिरणारे, दुचाकीवरील नागरिक, विनामास्क फिरणारे यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
कुकाण्यासह तेलकुडगाव, चिलेखनवाडी, जेऊर हैबती, भेंडा, देवगाव या सात गावांतही जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली कुकाणा पोलीस चौकी येथे बैठक झाली. त्यामध्ये जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला. यावेळी कुकाण्याच्या सरपंच लता अभंग, माजी सरपंच एकनाथ कावरे, जेऊर हैबतीचे सरपंच महेश म्हस्के, अमोल अभंग, सोमनाथ कचरे, तरवडीचे सरपंच जालिंदर तुपे, चिलेखनवाडीचे सरपंच भाऊसाहेब सावंत, व्यापारी संघटनेचे अभिजित लुणिया, कैलास म्हस्के, विष्णू गायकवाड, अशोक मिसाळ आदींनी विविध सूचना केल्या. या काळात मेडिकल, दवाखानेच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. इतर सर्व व्यवहार बंद ठेवले जाणार आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासन कडक कारवाई करेल, असा इशाराही देण्यात आला होता.
-----
२२ कुकाणा
कुकाणा येथे कोरोनाबाबतच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना अडवून पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.