अहमदनगर : जिल्ह्यातील १२३ आरोग्य केंद्रांची अग्निशमन यंत्रणा व वीज यंत्रणा सुरक्षिततेच्या दृष्टीने तपासणी जाणार असून, जिल्हा आरोग्य प्रशासनाने तसे आदेश दिले आहेत.
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात आग लागून निष्पाप बालकांचा मृत्यू झाल्यानंतर राज्य शासनाने तातडीने राज्यातील सर्वच आरोग्य केंद्रांचे फायर (अग्निशमन यंत्रणा) व इलेक्ट्रिक (वीज यंत्रणा) ॲाडिट करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, मनपाचे बाळासाहेब देशपांडे रुग्णालय, दोन उपकेंद्र, २३ ग्रामीण रुग्णालये व ९६ जिल्हा परिषदेंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र अशा एकूण १२३ आरोग्य केंद्रांचे ॲाडिट होणार आहे. ग्रामीण रुग्णालयांना जिल्हा शल्य चिकित्सकांनी, तर प्राथमिक आरोग्य केंद्रांना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी तशा सूचना दिल्या आहेत. याबाबत महापालिका व नगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणेकडे अर्ज करून त्यांना फायर ॲाडिटबाबत कळवले आहे तर विजेची यंत्रणा तपासून घेण्याबाबत महावितरणला सांगितले आहे.
पंधरा दिवसांपूर्वी भंडारा येथे जिल्हा रुग्णालयात आग लागून १० नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे राज्यात इतर ठिकाणी अशा घटना घडू नये यासाठी राज्य शासनाने सर्वच शासकीय आरोग्य केंद्रांची अग्निशमन व वीज यंत्रणा सदोष करण्याचे पाऊल उचलले असून तसे आदेश काढले आहेत. तातडीने हे ॲाडिट करून शासनाकडे अहवाल पाठविण्याचे आदेशात म्हटले आहे.
--------------
फायर व इलेक्ट्रिक ॲाडिटबाबत नगरपरिषदा तसेच महावितरणकडे अर्ज केलेला आहे. ते संबंधित ॲाडिट करणार आहेत. याशिवाय प्रत्येक प्राथमिक केंद्रात अग्निशमन यंत्रणेचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना दिले आहे.
- डाॅ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी
---------------
तालुकानिहाय प्राथमिक आरोग्य केंद्र
अकोले - ११
जामखेड - ५
कर्जत - ६
कोपरगाव - ६
नगर - ९
नेवासा - ९
पारनेर - ७
पाथर्डी - ६
राहाता ६
राहुरी - ९
संगमनेर - १३
शेवगाव - ६
श्रीगोंदा ८
श्रीरामपूर - ६
-----------
एकूण ९६